Join us  

पाडव्याला ‘कट्यार...’ची सांगीतिक भेट

By admin | Published: November 10, 2015 11:57 PM

मराठी रंगभूमीवरील मानाचे पान असलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ नाटकाचे रुपेरी पडद्यावर भव्य दर्शन असलेली सांगीतिक भेट रसिकांना पाडव्याच्या मुहूर्तावर मिळणार आहे.

मराठी रंगभूमीवरील मानाचे पान असलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ नाटकाचे रुपेरी पडद्यावर भव्य दर्शन असलेली सांगीतिक भेट रसिकांना पाडव्याच्या मुहूर्तावर मिळणार आहे. तब्बल साडेतीन वर्षांच्या अथक मेहनतीतून साकारलेल्या या चित्रपटात मराठी-हिंदीतील दिग्गज एकत्र आले आहेत. अभिनेता सुबोध भावेचे पहिलेच दिग्दर्शन, ज्येष्ठ अभिनेते सचिन यांची प्रथमच ग्रे शेड असलेली भूमिका तर आहेच; पण २१ गाण्यांतून उलगडत जाणारा चित्रपटाचा अनुपम प्रवासही पाहता येणार आहे. हा प्रवास ‘कट्यार काळजात घुसली’च्या टीममधील दिग्दर्शक-अभिनेता सुबोध भावे, एस्सेल व्हिजनचे बिझनेस हेड निखिल साने, पुष्कर श्रोत्री, गायक राहुल देशपांडे, महेश काळे, अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांनी सीएनएक्ससमोर मांडला.‘लोकमत’ला भेट देऊन हा सारा प्रवास उलगडलाज्येष्ठ नाटककार पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि पं. जितेंद्र अभिषेकींच्या बहारदार संगीताने सजलेलं हे नाटक रंगभूमीवर आलं आणि त्याने एक नवा इतिहास रचला. त्यातील खाँसाहेबांची भूमिका अजरामर केली होती पंडित वसंतराव देशपांडे यांनी. तर भानूशंकरजीच्या भूमिकेत होते ज्येष्ठ गायक अभिनेते पं. भार्गवराम आचरेकर. आज इतक्या वर्षांनंतरही या नाटकाची लोकप्रियता कमी झालेली नाही. या घडीलाही रंगभूमीवर अनेकांचे वेगवेगळ्या संचासह या नाटकाचे प्रयोग चालू आहेत. हेच नाटक आता भव्य रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.सुबोध भावे : पुरुषोत्तम दारव्हेकरांचे लेखन... पं. जितेंद्रबुवा अभिषेकी यांचे संगीत... आणि पं. वसंतराव देशपांडे यांनी साकारलेले ‘खाँसाहेब’ या वैशिष्ट्यांमुळे ‘कट्यार काळजात घुसली’ हे संगीत रंगभूमीवरील एक अजरामर नाटक ठरले. राहुल देशपांडे याने नाटकाचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या दिग्दर्शनाची जबाबदारी माझ्यावर सोपवली. नाटकाच्या विषयाचा आवाका पाहिल्यानंतर यावर एक चित्रपट निर्मित होऊ शकतो... असे वाटले. दारव्हेकर यांच्या लेखणीची ही ताकद आहे. हे नाटक आणि चित्रपट म्हणजे ‘श्रीराम-भरत’ भेट आहे. ‘शंकरभरण’ या पहिल्या सांगीतिकचित्रपटानंतर तब्बल ३५ वर्षांनी रुपेरी पडद्यावर शास्त्रीय संगीतावर बेतलेला चित्रपट येत आहे. ‘कट्यार काळजात घुसली’चा आत्मा ‘संगीत’ हाच आहे. २१ गाण्यांचा बुके या चित्रपटातून आम्ही रसिकांसमोर आणत आहोत. शास्त्रीय संगीत एका हौदासारखे आहे... ती जागा रिकामी झाल्यासारखी वाटली म्हणून केवळ थोडेसे पाणी टाकायचा प्रयत्न केला आहे. राहुल देशपांडे : माझे आजोबा पं. वसंतराव देशपांडे यांनी साकारलेला ‘खाँसाहेब’ रंगवण्याची खूप इच्छा होती. ती ‘कट्यार काळजात घुसली’ नाटकामध्ये पूर्ण झाली. आजही जेव्हा छोट्या गावांमध्येही कार्यक्रम करायला जातो तेव्हा आजोबांच्या बंदिशी सादर करण्याच्या जेव्हा फर्माईशी होतात... तेव्हा खूप आनंद होतो. शास्त्रीय संगीत आजही लोकांच्या मनात जिवंत आहे, याचे समाधान वाटते. भारतीय अभिजात संगीत क्षेत्रात पं. जितेंद्र अभिषेकी यांचे मोलाचे योगदान आहे... त्यांचे संगीत असे आहे, की त्याला काळाची मर्यादा नाही. हा चित्रपट शास्त्रीय संगीतावर आधारित असला तरी त्याचे एक्स्प्रेशन्स वेगळे आहेत. चित्रपटाचा गाभाच प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणू शकेल. मृण्मयी देशपांडे : नाटकात ‘उमा’ची भूमिका अनेक अभिनेत्रींनी केली; पण त्या मी पाहिल्या नाहीत. मला अशी भूमिका यापूर्वी कधीच करायला मिळाली नव्हती. उमाशी काही प्रमाणात माझा स्वभाव मिळताजुळता आहे. स्वत: शास्त्रीय संगीत शिकले आहे. नृत्यदेखील शिकत आहे. चित्रपटात मला गाण्यांना केवळ दाद द्यायची होती. सेटवरचे वातावरण इतके छान होते, की शूटिंग संपूच नये, असे वाटायचे. सुबोधच्या डोक्यात प्रत्येक सीन अगदी फिट्ट बसला होता. त्यामुळे त्याने माझ्याकडून बेस्ट असे काढून घेतले आहे, असे मला वाटते.निखिल साने : आज मराठीमध्ये अनेक इंटरेस्टिंग विषय बनत आहेत. ‘बालगंधर्व’, ‘रेगे’ यांसारख्या चित्रपटांना तरुणांनी पसंत केले. मराठीत होणाऱ्या वेगवेगळ्या प्रयोगांमुळे दिग्दर्शक आणि निर्मात्यांसमोर मोठे चॅलेंज आहे. हा काळ असा आहे, की वेगळे प्रयोग आपण नक्कीच करू शकतो. प्रगल्भ प्रेक्षकांना आशयघनता भावते, हे त्याचे प्रमुख कारण आहे. पुष्कर श्रोत्री : करिअरच्या वेगळ्या टप्प्यावर असताना काही तरी वेगळे करण्याची इच्छा होती. म्हणून ‘कट्यार काळजात घुसली’मधील कविराज साकारला. ‘कविराज’ असा एक माणूस आहे, ज्याला गाता येत नाही याचे दु:ख आहे. व्यक्तिगत जीवनात माझेही असेच आहे. पण तो आवाज त्याला सदाशिवमध्ये गवसला आहे.महेश काळे : चित्रपट म्हणजे एक लिबर्टी असते. नाटकाचे चित्रपटात रूपांतर करून आम्हालाही त्यात हातभार लावायची संधी सुबोधने दिली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने माझे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण होतेच आहे. त्याबरोबरच शंकर-एहसान-लॉय हे दिग्गज संगीतकार त्रिकूट आणि राहुल देशपांडे, शंकर महादेवन या गायकांबरोबर गाण्याचा एक जबरदस्त अनुभव माझ्या गाठीशी बांधला गेला आहे.