ग्लॅमरमागील कष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2015 02:48 AM2015-07-24T02:48:45+5:302015-07-24T02:48:45+5:30
चित्रपटातील कलावंतांना ग्लॅमरची झळाळी असते. त्यांना मिळणारे रसिकांचे प्रेम, त्याचबरोबर मानधनाचे आकडे (मराठीमध्येही आता वाढताहेत बरं.
चित्रपटातील कलावंतांना ग्लॅमरची झळाळी असते. त्यांना मिळणारे रसिकांचे प्रेम, त्याचबरोबर मानधनाचे आकडे (मराठीमध्येही आता वाढताहेत बरं...) यामुळे सामान्यांना त्यांच्या आयुष्याविषयी आकर्षण असते. मात्र, त्यामागे कष्टही असतात. आपण ताप आला किंवा डोकं दुखत असले, की ‘कॅज्युअल’ टाकून मोकळे होतो. परंतु, शूटिंगसाठी लाखो रुपयांचे स्टेक लागलेले असल्याने कलाकारांना मात्र ही चैन परवडण्यासारखी नसते. त्यातच बिझी शेड्युल, कामाचा ताण, वेळी-अवेळी खाणे, अपूर्ण झोप हे नेहमीचेच. याचा परिणाम तब्येतीवर होणे अगदी साहजिकच आहे; मात्र यातूनच कलाकारांचे कामाप्रती असलेले डेडीकेशनही समोर येते.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ‘शटर’ चित्रपटात एका छोट्या खोलीत एसीच काय; पण फॅनही नसताना तासन्तास शूटिंग केले होते. तिच्याच एका आगामी चित्रपटाचे शूटिंग चिखलठाणा येथे सुरू आहे. भर पावसात हे शूटिंग होते. सोनालीच्या अंगात ताप होता. अस्वस्थ वाटत होते. तरीही तिने हे शूटिंग पूर्ण केले.
‘बायोस्कोप’मधील ‘एक होता काऊ’च्या चित्रीकरणावेळीचा एक किस्सा कुशल बद्रिकेने सांगितला. त्याच्या सोबतची सहकलाकार स्पृहा जोशी शूटिंगच्या वेळी तापाने फणफणली होती. शॉट तर होता पावसातील. त्यामुळे भिजणे आलेच. अंगात ताप असतानाही स्पृहाने शूटिंग केले. अगदी पावसातील प्रसंगही केला.
असेच काहीसे घडले आहे मराठीतील चॉकलेट बॉय वैभव तत्त्ववादीच्या बाबतीत. शॉर्टकट, बाजीराव मस्तानी, चीटर आणि आगामी चित्रपटांच्या धावपळीमध्ये वैभव इतका तापाने फणफणला, की शूटिंग सुरू असताना चक्कर येऊन पडता पडता वाचला म्हणे. तरी हा पठ्ठ्या काम थांबवायला तयार नव्हता... का तर म्हणे माझ्यामुळे इतरांचा खोळंबा व्हायला नको...