Join us  

"दंगल"ला मुकणार पाकिस्तान, आमिरचा देशभक्तीसाठी कठोर निर्णय

By admin | Published: April 07, 2017 10:30 AM

पाकिस्तानची मागणी अमान्य करत आमिर खाननं देशभक्तीपोटी दंगल सिनेमा पाकिस्तानात रिलीज न करण्याचा निर्णय घेतला आहे. काय होती पाकिस्तानची नेमकी मागणी?

ऑनलाईन लोकमत
मुंबई, दि. 7 - सीमारेषेवर सुरू असलेल्या तणावामुळे काही काळ बॉलिवूड सिनेमांवर लावण्यात आलेली बंदी सध्या हटवण्यात आली आहे. असं असंल तरीही भारतात बॉक्सऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडित काढणारा व बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणार सिनेमा "दंगल" शेजारील देश पाकिस्तानात रिलीज होऊ शकला नाही आणि आता होणारही नाही. "दंगल" पाकिस्तानात का रिलीज करण्यात आला नाही, त्याचं कारणही समोर आले आहे. आमिर खाननं देशभक्तीपोटी आपला सिनेमा पाकिस्तान रिलीज न करण्याचा कठोर निर्णय घेतला.   
 
पाकिस्तानी सेंसर बोर्डनं सिनेमातील भारतीय राष्ट्रगीत आणि तिरंग्याशी संबंधित असलेली दोन दृश्यांना कात्री लावण्याची मागणी गेल्या आठवड्यात केली होती. सिनेमात मुख्य भूमिका निभावणारा आणि सिनेमाचा निर्माता परफेक्शनिस्ट आमिर खाननं या मागणीला स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानी जनता आमिरचा ब्लॉक बस्टर  दंगल सिनेमाला मुकणार आहे, हे निश्चित.  
(विनोद खन्ना यांची प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी दिली माहिती)
 
दंगल सिनेमा हा भारतीय कुस्तीपटू गीता-बबिता फोगट आणि त्यांचे वडील महावीर फोगट यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या सिनेमानं 385 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ज्या दृश्यांवर पाकिस्ताननं कात्री लावण्याची मागणी केली आहे ती दृश्य सिनेमाच्या शेवटी आहेत. दरम्यान, आमिर खानच्या प्रवक्त्यानं "टाइम्स ऑफ इंडिया"शी संवाद साधताना सांगितले की, "क्रीडा क्षेत्रातील आधारित प्रत्येक सिनेमामध्ये विजेत्यासहीत त्या-त्या देशाचा सन्मान करण्यात येतो, आणि ही गोष्टी स्वाभाविक आहे. जर हा सिनेमा पाकिस्तानात रिलीज करण्यात आला असता तर कदाचित 10 ते 12 कोटींचा गल्ला कमावला गेला असता. पण आता तसं न होता सिनेमाची पायरेटेड सीडी तयार होईल.  पण त्यांची मागणी मान्य न करता सिनेमा प्रदर्शित न करण्याचा निर्णय आम्ही घेतला.