बॉलिवूडमध्ये एकाहून एक सुपहिट चित्रपटांची निर्मिती करणारा लोकप्रिय दिग्दर्शक, निर्माता म्हणजे करण जोहर (Karan johar). आजवरच्या कारकिर्दीत करणने अनेक उत्तम कथानकांच्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यामुळे त्याचे चित्रपट प्रेक्षकांमध्ये कायम चर्चेत असतात. यामध्येच सध्या त्याचा आगामी 'जुग जुग जियो' हा चित्रपट चर्चेत आला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. परंतु, यात दाखवण्यात आलेल्या गाण्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. करणवर हे गाणं चोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका पाकिस्तानी गायकाने त्याच्यावर हा आरोप केला आहे.
'जुग जुग जियो' या चित्रपटातील 'नाच पंजाबन' हे पार्टी सॉन्ग रिलीज झाल्यानंतर अनेकांनी त्यावर कौतुकाचा वर्षाव केला. परंतु, हे गाणं नवंकोरं नसून ते जुनं असल्याचा आरोप पाकिस्तानी गायक अबरार उल हक (Abrar-ul-Haq) यांनी गायलं आहे. त्यामुळे करणने त्याच्या चित्रपटात वापरलेलं गाणं पाकिस्तानी गाण्याचं हिंदी वर्जन आहे. म्हणूनच Abrar-ul-Haq यांनी याविषयी सोशल मीडियावर ट्विट करत करणवर गाणं चोरीचा आरोप केला आहे.
Abrar-ul-Haq यांनी ट्विट करत करण व धर्मा प्रोडक्शन यांच्यावर गाणं चोरीचा आरोप केला आहे. तसंच हे गाणं वापरण्यापूर्वी त्यांनी कोणतीही परवानगी न घेतल्याचंही म्हटलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे.
काय आहे अबरार उल हक यांचं ट्विट?
"मी माझं नाच पंजाबन हे गाणं कोणत्याही भारतीय चित्रपटासाठी विकलेलं नाही. या गाण्याचे सगळे हक्क राखीव आहेत. ज्यामुळे वेळप्रसंगी मला त्याची नुकसान भरपाई मिळू शकेल. करण जोहर सारख्या निर्मात्याने हे गाणं कॉपी करायला नको होतं. हे माझं सहावं गाणं आहे जे कॉपी करण्यात आलं आहे. आणि, याची मी अजिबात परवानगी देणार नाही", असं ट्विट अबरार उल हक यांनी केलं.
कायद्याच्या कचाट्यात करण जोहर?
अबरार उल हक यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. त्यानुसार, "नाच पंजाबन या गाण्याचं लायसन्स कोणालाही दिलेलं नाही. आणि, जर तसा कोणी दावा करत असेल तर त्यांनी मला अॅग्रीमेंट दाखवावं. मी कायदेशीर कारवाई करेन."
दरम्यान, अबरार उल हक यांचं नाच पंजाबन हे गाणं २००० साली प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. त्यावेळी हे गाणं सुपरडुपर हिट झालं होतं. सध्या सोशल मीडियावर हा वाद चिघळत असून अनेकांनी करणला ट्रोल केलं आहे. मात्र, याविषयी करणने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अबरार उल हक हे एक गायक, गीतकार आणि राजकारणीदेखील आहेत. त्यांना किंग ऑफ पाकिस्तानी पॉप हे टायटलदेखील मिळालं आहे.