पल्लवी जोशीने आरोहण, अल्पविराम, जुस्तजू यांसारख्या अनेक मालिकांमध्ये खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिने बालकलाकार म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. आदमी सडक का डाकू, डाकू और महात्मा यांसारख्या चित्रपटात ती बालकलाकाराच्या भूमिकेत दिसली. तिने तिच्या आजवरच्या कारकिर्दीत एकाहून एक सरस भूमिका साकारल्या आहेत. तिला तिच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कारने देखील सन्मानित करण्यात आले आहे. ती काही महिन्यांपूर्वी ग्रहण या मालिकेत झळकली होती. छोट्या पडद्यावरील 'ग्रहण' मालिकेद्वारे पल्लवीने छोट्या पडद्यावर कमबॅक केले होते. या मालिकेत पल्लवी जोशीचा हटके आणि अनोखा अंदाज पाहायला मिळाला होता. पल्लवीने आज तिच्या अभिनयाने छोट्या पडद्यावर तिची एक खास जागा निर्माण केली आहे.
पल्लवीप्रमाणेच तिची बहीण पद्मश्रीदेखील एक अभिनेत्री असल्याचे तुम्हाला माहीत आहे का? पल्लवीच्या बहिणीने नणंद भावजय या चित्रपटात काम केले होते. तसेच गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या व्हेंटिलेटर या चित्रपटात ती महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. पद्मश्री ही अभिनेते विजय कदम यांची पत्नी असून त्यांना एक मुलगा देखील आहे. अनेकवेळा पद्मश्री, विजय कदम आणि पल्लवी जोशी यांना सार्वजनिक स्थळी एकत्र पाहाण्यात येते.
पल्लवीच्या आधी तिच्या भावाने चित्रपटसृष्टीत एक काळ गाजवला आहे. मास्टर अलंकारने दीवार या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेची खूप चर्चा झाली होती. त्यानंतर अलंकारला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या. त्या काळातील सगळ्यात जास्त डिमांडमध्ये असलेला तो बालकलाकार होता असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. त्याने सीता और गीता, शोले, धडकन, ड्रीमगर्ल अशा प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केले आहे. मास्टर अलंकारचे खरे नाव अलंकार जोशी असून तो गेल्या अनेक वर्षांपासून अभिनयक्षेत्रापासून दूर आहे. तो सध्या अमेरिकेत राहात असून तिथे त्याचा प्रचंड मोठा व्यवसाय आहे. त्याच्या मुलीच्या इन्स्टाग्रामच्या पेजवर आपल्याला त्याचे फोटो पाहायला मिळतात.