Join us

अखेर तो क्षण आला सारेगमप लिटिल चॅम्प्स शोमध्ये पल्लवी जोशीची एंट्री, जुन्या आठवणींना देणार उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 17:48 IST

पल्लवी जोशी या मंचावर आल्याने अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. तसंच स्वप्नील बांदोडकर देखील या लिटिल चॅम्प्सचं कौतुक करताना दिसणार आहेत.

'सारेगमप लिट्ल चॅम्प्स’ च्या नवीन पर्वाला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली. पाहता पाहता हे १४ ही स्पर्धक प्रेक्षकांचे लाडके बनले आहेत. प्रत्येक आठवड्यात हे लिटिल चॅम्प्स आपल्या भन्नाट सादरीकरणाने सगळ्यांना थक्क करतात. यांच्या उत्तम परफॉर्मन्सने प्रेक्षक आणि पंचरत्न देखील मंत्रमुग्ध होतात. येत्या आठवड्यात गणेशोत्सव विशेष भागात काही खास पाहुणे कलाकार या मंचावर सज्ज होणार आहेत. हे पाहुणे कलाकार म्हणजे सारेगमप या कार्यक्रमाशी अतूट नातं असलेली सगळ्यांची लाडकी अभिनेत्री पल्लवी जोशी आणि महाराष्ट्रातातील तमाम संगीतप्रेमींचा आवडता गायक स्वप्नील बांदोडकर.

 

हे दोघे या मंचावर आपल्या उपस्थितीने या गणेशोत्सव विशेष भागात बहार आणणार आहेत.पल्लवी जोशी यांचं या कार्यक्रमासोबत एक विशेष नातं आहे. पंचरत्नांच्या पर्वाच सूत्रसंचालन हे पल्लवी जोशी यांनी केलं होतं आणि हीच पंचरत्न या पर्वात परीक्षकांची भूमिका निभावत आहेत. रोहित राऊत, आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन आणि कार्तिकी गायकवाड हे ज्युरी म्हणून झळकत आहेत. या कार्यक्रमामुळे ज्युरी म्हणून झळकत असणारे पंचरत्नांना अफाट लोकप्रियता मिळाली. जगाच्या कानाकोपऱ्यातून यांना प्रेम मिळालं .सारेगमपमुळे पंचरत्न म्हणून नावारूपाला आले, १२ वर्षानंतर देखील पंचरत्नांची मैत्री तितकीच घट्ट आहे,  एकत्र काम देखील केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एकत्र या मंचावर येऊन खूप धमाल करत असल्याचे पाहायला मिळतंय इतकंच नाहीतर  जुन्या आठवणींना उजाळा देतायेत. १२ वर्षांपूर्वी सारेगमा लिटील चॅम्प्सला पल्लवी जोशीने सूत्रसंचालन केले होते. त्यामुळे या पर्वातही कुठेतरी रसिक पल्लवी जोशीलाही मिस करत होते. अखेर आता चाहत्यांची ती इच्छा पूर्ण होणार आहे.

त्यामुळे पल्लवी जोशी या मंचावर आल्याने अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. तसंच स्वप्नील बांदोडकर देखील या लिटिल चॅम्प्सचं कौतुक करताना दिसणार आहेत. इतकंच नव्हे तर या मंचावर विराजमान झालेले बाप्पा देखील खूप खास आहेत कारण हि श्रींची मूर्ती सर्व लिटिल चॅम्प्सनी मिळून बनवली आहे. बाप्पांचा आशीर्वाद या लिटिल चॅम्प्सच्या पाठीशी सदैव असेलच यात शंका नाही.

टॅग्स :पल्लवी जोशीस्वप्निल बांदोडकर