Panchayat 2 Prahlad Pandey aka Faisal Malik on last episode and climax : ‘पंचायत 2’ (Panchayat 2) या वेबसीरिजचा शेवटचा एपिसोड पाहताना डोळे पाणावतात. हा एपिसोड पाहिल्यानंतर प्रत्येक जण प्रल्हाद पांडेच्या (Prahlad Pandey) प्रेमात पडला आहे. पहिल्या व दुसऱ्या सीझनच्या सातव्या एपिसोडपर्यंत प्रल्हाद पांडे मस्तमौला व रूबाबदार उपप्रधानाच्या रूपात दिसतो. आठव्या एपिसोडमध्ये पित्याच्या रूपात त्याचं एक वेगळंच हळवं रूप पाहायला मिळतं. प्रल्हाद पांडे सर्वांना रडवतो. अभिनेता फैजल मलिकने (Faisal Malik) प्रल्हाद पांडेची भूमिका साकारली आहे. ‘पंचायत 2’चा आठवा एपिसोड शूट करताना खुद्द फैजलही मनातून घाबरला होता. आजतकला दिलेल्या मुलाखतीत फैजल ‘पंचायत 2’च्या शेवटच्या एपिसोडबद्दल बोलला.
मी घाबरलो होतो...तो म्हणाला, ‘पंचायत 2’च्या शेवटच्या एपिसोडची स्क्रिप्ट वाचली तेव्हा मी मनातून अक्षरश: घाबरलो होतो. अखेरच्या एपिसोडमध्ये कथा इतकी भावुक वळण घेईल, याचा मी विचार सुद्धा केला नव्हता. मी इतका इमोशनल सीन करू शकेल की नाही, असा प्रश्न मला पडला होता. स्क्रिप्ट वाचल्याक्षणी मी लेखकाला फोन केला. तुम्ही माझ्यावर जरा जास्तच विश्वास टाकत आहात. मी काही इतका मोठा अभिनेता नाही. मी हा सीन करू शकेल, असं मला वाटत नाही, असं मी लेखकाला म्हणालो. पण लेखकाने मला या सीनसाठी राजी केलंच. तू सहज करशील, असं ते मला म्हणाले. पण माझ्या मनातील भीती कमी होत नव्हती. प्रल्हाद पांडेचा शहिद मुलाच्या अंत्यसंस्काराचा सीन आपण करू शकलो नाही तर आत्तापर्यंत कमावलेलं नाव मातीत जाईल, अशी भीती मला वाटत होती. ‘पंचायत 2’चा क्लायमॅक्स सीन शूट करायला मला आठवडा लागला. मुलगा गमावल्याचं बापाचं दु:ख दाखवताना प्रत्येक गोष्टीची काळजी घेतल्या गेली. प्रोस्थेटिक मेकअपची मदतही घेतली गेली.
अपघाताने बनला अभिनेतातुम्हाला कदाचित माहित नसेल की, फैजल मलिक हा मुळात एक निर्माता आहे. कंगना राणौतपासून रणदीप हुड्डापर्यंत अनेक कलाकारांचे सिनेमे त्याने प्रोड्यूस केले आहेत. त्याचं स्वत:चं प्रॉडक्शन हाऊस आहे. मग तो अभिनेता कसा बनला? तर अपघाताने. होय, ‘गँग आॅफ वासेपूर’ या चित्रपटात त्याला अपघाताने भूमिका मिळाली. एकदिवस सेटवरचा एक अभिनेता अचानक पळून गेला. त्याची भूमिका कोण साकारणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला आणि त्याच्याजागी ऐनवेळी फैजल मलिकची वर्णी लागली.