मराठा साम्राज्याचा इतिहास आणि पानिपतच्या युद्धाची कथा ‘पानिपत’ या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. पण तूर्तास हा चित्रपट वादात सापडला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर ‘पानिपत’चे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिहत आहेत. या धमक्यानंतर गोवारीकर यांच्या सुरक्षेत 200 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. ट्रेलर रिलीज झाल्यानंतरच लगेच गोवारीकर यांना धमक्यांचे सत्र सुरु झाले. अनेकांनी या चित्रपटात ऐतिहासिक पात्र आणि घटनांशी छेडछाड केल्याचा आरोप केला. चित्रपटातील काही सीन्सवरही आक्षेप नोंदवण्यात आला आहे. टाईम्स आॅफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या संपूर्ण धमक्यांचे गांभीर्य बघता आशुतोष गोवारीकर यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
चित्रपटात संजय दत्त अहमद शाह अब्दाली तर अर्जुन कपूर सदाशिवरावांच्या भूमिकेत आहे. तर क्रिती सॅनन हिने पार्वतीबाईंची भूमिका साकारली आहे. यासोबतच पद्मिनी कोल्हापुरे, झीनत अमान, मोहनीश बहल यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर तीन वर्षांनंतर कमबॅक करत आहेत. 2016 मध्ये गोवारीकर यांचा ‘मोहेंजोदारो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र या चित्रपटाने प्रेक्षकांची निराशा केली होती. या चित्रपटानंतर गोवारीकर ‘पानिपत’ घेऊन येत आहेत. साहजिकच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अजय-अतुलने संगीतबद्ध केलेला हा चित्रपट येत्या ६ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.