Join us  

पंकज त्रिपाठींनी राम मंदिर सोहळ्याला जाण्यास दिला नकार, कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 3:36 PM

सध्या संपूर्ण देशवासीय २२ जानेवारीची वाट पाहत आहेत. पंकज त्रिपाठींनी मात्र त्या दिवशी अयोध्येला जाण्यास नकार दिलाय.

अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) सध्या 'मै अटल हूँ' सिनेमामुळे चर्चेत आहेत. पंकज त्रिपाठी कोणत्याही भूमिकेत असले तरी प्रेक्षकांना त्यांना पडद्यावर पाहण्यात मजाच येते. विनोदी भूमिकांनंतर पंकज त्रिपाठींना थेट माजी पंतप्रधान अटल बिहापी वाजपेयी यांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. नुकतंच सिनेमाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये त्यांना अयोध्याराम मंदिर उद्घाटनाला जाणार का असा प्रश्न विचारला. तेव्हा त्यांचं उत्तर ऐकून सगळेच चकित झाले.

सध्या संपूर्ण देशवासीय २२ जानेवारीची वाट पाहत आहेत. अयोध्येत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याने हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. विविध क्षेत्रातील दिग्गजांना या उद्घाटन सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे. पंकज त्रिपाठींनाही ते भाग्य लाभलं आहे. मात्र त्या दिवशी अयोध्येला जाण्यासाठी पंकज त्रिपाठींनी नकार दिला आहे. 'मै अटल हूँ' च्या प्रमोशननिमित्त दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले,'मी पूर्वांचलचा रहिवासी आहे. त्यामुळे मी कधीही गुपचूप श्रीरामाचं दर्शन करुन येईन. काय आहे ना मला जगाच्या नजरेपासून दूर राहत तीर्थस्थानांचं दर्शन करायला जास्त आवडतं. मी तिथे शांतपणे कुटुंबासोबत चिंतन मनन करतो.' 

पंकज त्रिपाठींना प्रभू श्रीरामाची भूमिका करायला मिळाली तर कराल का असे विचारले असता ते म्हणाले,'मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम माझ्यासाठी प्रिय आहेत. मला त्यांचीच भूमिका करायला आवडेल. आता मी त्या वयोगटातला नाही हे खरंय. माझं वय आता ४८ आहे आणि सिनेमांमध्ये तरुणपणीच्या श्रीरामाचीच गोष्ट दाखवतात. पण असं असतानाही जर फिल्ममेकरने माझ्यावर विश्वास ठेवला तर मी नक्कीच करेन.'

पंकज त्रिपाठींचा 'मै अटल हूँ' सिनेमा १९ जानेवारी रोजी प्रदर्शित होतोय. ट्रेलर तर सर्वांच्याच पसंतीस पडला आहे. आता चाहत्यांना सिनेमाची उत्सुकता आहे. याआधी पंकज त्रिपाठींचा 'ओएमजी 2' सिनेमा आला. या सिनेमातील त्यांचा अभिनयही प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता.

टॅग्स :पंकज त्रिपाठीराम मंदिरअयोध्या