नवी दिल्ली : 'मैं अटल हूं' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत असलेले अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी मोठे पाऊल उचलले आहे. पंकज त्रिपाठी यांनी भारतीय निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय आयकॉन पद सोडले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंकज त्रिपाठी यांनी राष्ट्रीय आयकॉन पद सोडल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. तसेच, पंकज त्रिपाठी यांनी निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय आयकॉन पदापासून स्वतःला का दूर केले? याबाबत अनेकांना जाणून घ्यायचे आहे. दरम्यान, पंकज त्रिपाठी यांनी राष्ट्रीय आयकॉन पद सोडल्याबद्दलचे कारणही निवडणूक आयोगाने दिले.
ट्विटरवर माहिती देताना निवडणूक आयोगाने सांगितले की, "पंकज त्रिपाठी एका आगामी चित्रपटात राजकीय नेता म्हणून दिसणार आहे. अशा परिस्थितीत, त्यांची भूमिका स्वीकारून एमओयूच्या अटींनुसार ते स्वेच्छेने भारतीय निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय आयकॉन पदावरून पायउतार होत आहेत. अभिनेते ऑक्टोबर 2022 पासून मतदार जागृती आणि #SVEEP शी संबंधित होते. त्यांचे खूप खूप आभार." दरम्यान, अभिनेते पंकज त्रिपाठी यांची ऑक्टोबर 2022 मध्ये भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आयकॉन म्हणून नियुक्ती केली होती.
या ट्विटनंतर पंकज त्रिपाठी यांनी हा निर्णय आपल्या आगामी 'मैं हूं अटल' या चित्रपटामुळे घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या चित्रपटात ते ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले असून हा चित्रपट 19 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याचबरोबर, पंकज त्रिपाठी यांनी राजकारणात प्रवेश करण्याबाबतही भाष्य केले. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत पंकज त्रिपाठी म्हणाले होते की, ते ज्या राज्यातून येतात, तेथे प्रत्येकजण राजकारणी असतो. दरम्यान, पंकज त्रिपाठी हे बिहारमध्ये आपल्या महाविद्यालयीन काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (एबीव्हीपी) सदस्य होते.