Pankaj Tripathi : मुंबईत सध्या रस्त्यारस्त्यावर 'आजमगढ' या सिनेमाचे पोस्टर दिसत आहेत. या पोस्टरवर अभिनेता पंकज त्रिपाठी मौलवीच्या वेशभूषेत बघायला मिळत आहे. तरुणांना दहशतवादाचा मार्ग दाखवणाऱ्या मौलवीची ती भूमिका आहे. माध्यम रिपोर्टनुसार पंकज त्रिपाठी यामुळे नाराज झाले आहेत. तसेच ते कायदेशीर कारवाई करण्याच्याही तयारित आहेत.
पंकज त्रिपाठी यांनी ५ वर्षांपूर्वीच 'आजमगढ' ही शॉर्ट फिल्म केली होती. यामध्ये ते पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत होते. त्यावेळेस फिल्म रिलीज होऊ शकली नाही. पंकज त्रिपाठी यांना फिल्म रिलीजविषयी माहितच नव्हते. जागोजागी पोस्टर्स पाहिल्यानंतर त्यांना या फिल्मच्या ओटीटी रिलीजविषयी समजले. एकीकडे त्यांचा 'ओह माय गॉड 2' हा सिनेमा रिलीज होणार आहे. तेव्हाच 'आजमगढ' सिनेमाशी त्यांचं नाव जोडणं हे काहीसं संशयास्पद आहे.
'आजमगढ' सिनेमा कमलेश कुमार यांनी दिग्दर्शित केला आहे. त्यांना त्यांच्या एका डॉक्युमेंट्रीसाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. आजमगढ ऐकताच उत्तर प्रदेशच्या गुन्ह्यांच्या प्रकरणांची आठवण येते. ओटीटी क्रिएटिव्ह हेड संजय भट्ट यांनी सांगितले की, आजमगढचा राहणारा प्रत्येक तरुण हा दहशतवादी नाही हे फिल्ममधून दाखवण्यात आले आहे. या फिल्मला सिरीज आणि सिनेमा अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये रिलीज करण्याची योजना आहे. ही 90 मिनिटांची फिल्म आहे. 2018 मध्येच याचे चित्रिकरण झाले होते. कोरोनामुळे फिल्म रिलीज होऊ शकली नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, ही शॉर्ट फिल्म असल्याचं सांगत पंकज त्रिपाठी यांनी फक्त तीन दिवस यासाठी शूटिंग केले होते. मात्र सिनेमाचे निर्माता पंकज त्रिपाठी यांच्या लोकप्रियतेचा असा काही फायदा घेत आहेत की जसे काय तेच या फिल्म मध्ये मुख्य भूमिकेत आहेत. आपल्या प्रसिद्धीचा वापर करत फिल्मचा प्रचार केला जाऊ नये असे पंकज त्रिपाठी यांना वाटते. म्हणूनच मेकर्सने ऐकलं नाही तर ते कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारित आहेत.
पंकज त्रिपाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांच्या कालीन भैय्या, माधव मिश्रा, सुल्तान कुरेशी, भानुप्रताप या भूमिका लोकप्रिय झाल्या आहेत. लवकरच ते 'ओह माय गॉड २' मध्येही दिसणार आहेत. तसंच 'मिर्झापूर ३' साठीही चाहते उत्सुक आहेत.