Join us

Pankaj Tripathi: 'कालीन भैय्या' निवडणुकीच्या रिंगणात, पण उमेदवार म्हणून नाही तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2022 4:41 PM

मिर्झापूर फेम पंकज त्रिपाठी आता नव्या रूपात दिसणार

Pankaj Tripathi: OTT वरील अनेक वेब सिरीजमधून आपली ओळख निर्माण करणारा अभिनेता पंकज त्रिपाठी याला आपला राष्ट्रीय आयकॉन बनवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. निवडणूक आयोगाचे (Election Commission of India) मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी सोमवारी ही घोषणा केली. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आणि मतदानाचा प्रचार करण्यासाठी निवडणूक आयोग प्रसिद्ध व्यक्तींना राष्ट्रीय आयकॉन किंवा ब्रँड अॅम्बेसेडर बनवत असतो. 2014 मध्ये, निवडणूक आयोगाने टीम इंडियाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराला गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ब्रँड अॅम्बेसेडर बनवले होते. आता अभिनेता पंकज त्रिपाठी निवडणुकीच्या रिंगणारत उतरणार असून, उमेदवार म्हणून नव्हे तर जनजागृतीसाठी उतरणार आहेत.

२०१४ साली जेव्हा गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्या, त्यावेळी निवडणूक आयोगाने भारतीय क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराला निवडणुकीसाठी सदिच्छादूत बनवले होते. मात्र, तोपर्यंत पुजाराने स्वत: एकदाही मतदान केले नव्हते. पुजारा म्हणाला होता की, क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे मला अद्याप मतदानासाठी वेळ मिळालेला नाही, परंतु भविष्यात मी मतदान करण्याचा प्रयत्न करेन. निवडणूक आयोगाने महेंद्रसिंग धोनीलाही ब्रँड अॅम्बेसेडर बनवले होते, मात्र तो स्वत: मॅचमध्ये व्यस्त असल्यामुळे लोकसभा निवडणुकीत मतदान करू शकला नव्हता.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी सहा राज्यांतील सात विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकीची तारीख जाहीर केली. यासाठी आयोगाने अधिसूचना जारी केली आहे. या सहाही राज्यांतील सात विधानसभा जागांसाठी ३ नोव्हेंबरला मतदान आणि ६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, महाराष्ट्र, तेलंगणा आणि ओडिशा या राज्यांतील या निवडणुका आहेत. या पोटनिवडणुका महाराष्ट्रातील अंधेरी पूर्व, बिहारमधील मोकामा आणि गोपालगंज, हरियाणातील आदमपूर, तेलंगणातील मुनुगोडे, उत्तर प्रदेशातील गोला गोकरनाथ आणि ओडिशाच्या धामनगर येथे होणार आहेत.

टॅग्स :भारतीय निवडणूक आयोगपंकज त्रिपाठीमिर्झापूर वेबसीरिजनिवडणूक