झी मराठी वाहिनीवरील बस बाई बस(Bas Bai Bas)च्या या आठवड्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी हजेरी लावली होती. सुप्रिया सुळे, अमृता फडणवीस यांच्यानंतर पंकजा मुंडे यांची कार्यक्रमात वर्णी लागली आहे. बस बाई बस कार्यक्रमाला कमी कालावधीत प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या आठवड्याचा भाग पंकजा मुंडे यांच्या बेधडक बिनधास्त प्रश्नोत्तरांनी खुलून आला आहे. अभिनेता प्रसाद ओक कार्यक्रमाचा सूत्रधार आहे. प्रसाद ओक त्याच्या शैलीने येणाऱ्या पाहुण्यांना बोलते करण्याचा प्रयत्न करत असतो. यावेळी सुबोध भावेच्या प्रश्नांना पंकजा मुंडे यांनी उत्तर दिली खरी मात्र कार्यक्रमाच्या मध्यावर वडील गोपीनाथ मुंडे यांचा फोटो पाहून पंकजा मुंडे इमोशनल झाल्याचे पाहायला मिळाले.
बस बाई बस कार्यक्रमात सहभागी पाहुण्यांना एक फोटो दाखवून त्यांच्याशी संवाद साधायला सांगितले जाते. फोटोमध्ये असलेल्या व्यक्तीसोबत मनात असलेली भावना बोलून दाखवायची असते.
या खेळात पंकजा मुंडे यांना त्यांचे वडील आणि राजकीय दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटो दाखवण्यात आला. वडीलांचा फोटो पाहताच पंकजा मुंडे भावुक झाल्या. गोपीनाथ मुंडेंचा फोटो दाखवल्यानंतर पंकजा मुंडे यांना सुबोध भावेने 'तुम्हाला काय बोलायचे आहे ते बोला', असे म्हटले. त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, 'मी काहीही बोलू शकत नाही. मी त्यांच्याशी बोलतच नाही. कारण त्यांनी आम्हाला इतक्या लवकर आम्हाला असे अर्ध्यावर टाकून जायला नको होते'. उत्तर देत पंकजा मुंडेंना अश्रू अनावर झाले.
दरम्यान या कार्यक्रमात पंकजा मुंडेंना अनेक राजकीय तसेच वैयक्तिक आयुष्याविषयी प्रश्न विचारण्यात आले. कधी विरोधी पक्षाचे आमदार फोडले आहेत का असा प्रश्न विचारल्यानंतर पंकजा मुंडेंनी क्षणाचा विलंब न करता हो असे उत्तर दिले. त्यावर स्पष्टीकरण देताना पंकजा ताईंनी विनोद निर्मितीही केली.