पालकांशी वैयक्तिक पातळीवर संवाद साधणं गरजेचं- गिरीजा ओक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 05:54 PM2018-08-23T17:54:39+5:302018-08-23T17:54:58+5:30

झी युवा वाहिनीवर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आलेला ‘स्पर्श वात्सल्याचा’ या अनोख्या कार्यक्रमातून गिरीजा ओक-गोडबोले एका सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसत आहे. कुटुंबात येणाऱ्या एका नव्या पाहुण्याची उत्सुकता असते आणि त्यातून येणारी आव्हाने आणि जबाबदारीतून प्रत्येक पालकांना जावे लागतेच.

Parents need to interact at a personal level - Girija Oak | पालकांशी वैयक्तिक पातळीवर संवाद साधणं गरजेचं- गिरीजा ओक

पालकांशी वैयक्तिक पातळीवर संवाद साधणं गरजेचं- गिरीजा ओक

googlenewsNext

-रवींद्र मोरे 

झी युवा वाहिनीवर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आलेला ‘स्पर्श वात्सल्याचा’ या अनोख्या कार्यक्रमातून गिरीजा ओक-गोडबोले एका सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसत आहे. कुटुंबात येणाऱ्या एका नव्या पाहुण्याची उत्सुकता असते आणि त्यातून येणारी आव्हाने आणि जबाबदारीतून प्रत्येक पालकांना जावे लागतेच. मुलांची काळजी कशी घ्यावी याविषयी नवीन पालकांचे प्रबोधन करण्यात हा कार्यक्रम महत्वाची भूमिका निभावणार आहे. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा गिरीजा ओक-गोडबोले ही लीलया सांभाळत आहे. या कार्यक्रमाविषयी तिच्यासोबत साधलेला हा खास संवाद...

* कार्यक्रमाची संकल्पना पहिल्यांदा ऐकल्यावर तुमच्या मनात कोणता विचार आला होता? तुम्ही सूत्रसंचालकाची भूमिका का स्वीकारली?
- या कार्यक्रमाची संकल्पना ऐकल्यानंतर माझ्या मनात पहिली गोष्ट आली की ही संकल्पना प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, कारण लहान मुलं ही सर्वांनाच आवडतात. लहान मुलं हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे आणि म्हणून मी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायला होकार दिला. मी स्वत: एक आई असल्यामुळे लहान मुलांना हाताळण्याची मला सवय आहे. या कार्यक्रमाचे चित्रीकरण करणे जितके दिसते तितके सोपं नसतं कारण लहान मुलांच्या मूडवर आमचं सर्व वेळापत्रक अवलंबून असतं. एका सीनमध्ये टेबल वर टेबल क्लॉथ असतं तर ते दुसऱ्या  सिनमध्ये टेबल वर दिसत नाही कारण ते बाळ टेबल क्लॉथ खेळता खेळता खेचतं आणि बाजूला करतं, त्यामुळे शूटिंग करणाऱ्या  युनिटची खूप धावपळ होते पण त्या धावपळीत आणि फजितीमध्ये देखील एक गम्मत असते. मी ही संधी स्विकारली कारण एक अभिनेत्री म्हणून आम्हाला आमच्या प्रेक्षकांकडे जाण्याची व त्यांच्याशी वैयक्तिक पातळीवर संवाद साधण्याची आणि त्यांना समजून घेण्याची संधी क्वचित मिळत असते.

* तुम्ही आतापर्यंत अनेक गोंडस बाळांना भेटल्या आहेत, त्यांच्या बद्दल आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दलचा तुमचा अनुभव आम्हाला सांगा.
- मी भेटलेली सर्व लहान मुलं सहा महिने ते १ वर्ष या वयोगटातील आहेत. ही सर्व मुलं अतिशय गोंडस आहेत आणि आम्ही चित्रीकरणासाठी जात असल्यामुळे त्यांचे आईवडील त्यांना छान छान कपडे घालतात त्यामुळे ते अधिकचसुंदर दिसतात. पहिलं बाळ हे प्रत्येक कुटुंबासाठी खास असतं आणि त्या बाळाची चाहूल लागल्यापासून ते त्याचा जन्मानंतर त्याच्या आई बाबांचा पालक म्हणून सुरु झालेला प्रवास, त्यांच्यासाठी केलेली जागरणं तसेच त्या माऊलींच्या जोडीदाराची त्यांना असलेली साथ याचा एकंदरीत प्रवास ऐकण्याचा अनुभव अतिशय गोड आहे. पहिलं बाळंतपण ही अत्यंत युनिव्हर्सल कंसेप्ट आहे पण प्रत्येक जोडप्याचे अनुभव अनोखे आणि रिलेटेबल असतात आणि त्यांचा प्रवासात तितक्याच उत्साहाने सांगतात त्यामुळे त्यांचा प्रवास व त्यांचे अनुभव ऐकायला खूप गोड वाटतात.   

* मुलांची काळजी घेण्याविषयी कुटुंबांना जास्त माहिती देणे तुम्हाला किती महत्वाचे वाटते?
- मुलांच्या संगोपनातील हा एक अविभाज्य भाग आहे. मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने बऱ्याच कुटुंबाना भेटली आणि मला असं एकंदरीतच लक्षात आलं की, सी-सेक्शन डिलेव्हरी बद्दल बहुतेकांच्या मनात प्रचंड भीती आहे. सी-सेक्शन डिलेव्हरी झाली की अनेक जण नाराज होतात आणि त्याचा ताण त्या आईवर येतो. सी-सेक्शन किंवा नॉर्मल डिलेव्हरी हे त्या आईच्या हातात नसते त्यामुळे अशावेळी डॉक्टरवर पूर्ण विश्वास टाकावा. नॉर्मल  डिलेव्हरीच्या अट्टाहासामुळे त्या आईवर ताण येतो. शेवटी आई आणि बाळ सुखरूप असणे जास्त महत्वाचे आहे. त्यामुळे सी-सेक्शन डिलेव्हरीचा ताण लोकांनी घेऊ नये असं मला वाटतं. 

* तुम्ही स्वत: एक आई आहात आणि त्याची या कार्यक्रमाचा सूत्रसंचालनासाठी कितपत मदत झाली?
- आमच्या संपूर्ण युनिटमध्ये सर्व यंगस्टर्स आहेत. त्यांना स्वत:ची मुलं नाहीयेत पण शूटिंगदरम्यान ते सर्व लहान मुलांच्या कलाने घेतात. पण मी स्वत: आई असल्यामुळे मी त्यांना काही छोट्या छोट्या गोष्टी सुचवू शकते. मी स्वत: लहान मुलांसोबत कम्फर्टेबल असते आणि त्या लहान मुलांचे आई बाबा देखील माझ्याकडे मुलं सोपवताना कम्फर्टेबल असतात कारण त्यांना माहित आहे की, मी लहान मुलं हाताळलेली आहेत.

*  तुमच्या वैयक्तिक जीवनाची व्यावसायिक जीवनाशी सांगड तुम्ही कशी घालता?  काही गुप्त मंत्र?
- माझं कुटुंब हे पुण्यात आहेत व मी कामासाठी मुंबईमध्ये येत असल्यामुळे मुंबई पुणे मुंबई करताना बाळाचं संगोपन आणि काम यात माझी तारेवरची कसरत होते. माझ्या अनुपस्थितीत माझे पती आमच्या बाळाची संपूर्णपणेकाळजी घेतात. माझी आई तसेच माझं संपूर्ण गोडबोले कुटुंब हे कबीरची काळजी घेण्यासाठी तत्पर असतं. तसंच मला आवर्जून सांगावस वाटतं की, माझा मुलगा कबीर हा स्वत: खूप समजूतदार आहे. तो माझ्या बिझी शेड्युलला समजून घेतो. अर्थात तो लहान असल्यामुळे कधीकधी त्याची चिडचिड होते पण तो त्याच्या आईला समजून घेतो.

Web Title: Parents need to interact at a personal level - Girija Oak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.