सिनेमा आणि थिएटरमधील ४० वर्षांच्या करिअरमध्ये अभिनेते परेश रावल यांनी आजवर अनेक आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत. पण ३० जून २०१० रोजी श्रीलंकेत 'रेडी' सिनेमातील एक सीन त्यांना आजही आजवरचा सर्वात कठीण क्षण वाटतो. कारण त्या दिवशी परेश रावल यांना मातृशोक झाला होता.
सलमानची पार्टी आणि चर्चा एक्स गर्लफ्रेंडची, 'मिठी अन् कपाळावर Kiss'; व्हिडिओ व्हायरल
बॉलीवूडचा 'दबंग' सलमान खान या सिनेमात मुख्य भूमिकेत होता. आज सलमानच्या वाढदिवसाच्या निमित्तानं परेश रावल यांनी 'रेडी' सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचा एक किस्सा सांगून सलमानची एक वेगळी बाजू सर्वांसमोर आणली आहे.
"जेव्हा मला आईच्या निधनाची बातमी कळाली आणि त्याक्षणाला मी पूर्णपणे कोसळलो होतो. खूप दु:खी होता. पण त्यावेळी सलमान खाननं मला सावरलं. संपूर्ण दिवसभर मला त्यानं खचू दिलं नाही आणि माझी मुंबईला पोहोचण्यासी सर्व व्यवस्था त्यानं जातीनं पाहिली. दुर्दैवानं त्यादिवशी संध्याकाळपर्यंत कोलंबोहून मुंबईसाठीची कनेक्टिंग फ्लाइट नव्हती. सेटवर एका कोपऱ्यात शांत बसून राहण्याशिवाय माझ्याकडे त्यादिवशी कोणताच पर्याय नव्हता. पण मी तो दिवस भरुन काढण्याचं ठरवलं आणि माझं त्यादिवशीचं शूट पूर्ण केलं. मी खरंच सांगतो त्यादिवशीचा माझा परफॉरमन्स माझ्या करिअरमधील आजवरचा सर्वात आव्हानात्मक होता. मला दारु प्यायलेल्या व्यक्तीचा अभिनय करायचा होता. नंतर महेश मांजरेकरला एका सीनमध्ये सामोरं जायचं होतं. महेशला धमकी देण्याचा सीन होता. सर्वसामान्य दिवस असता तर माझ्यासाठी तो सीन काहीच कठीण नव्हता. पण माझ्यावर ओढावलेल्या प्रसंगानं मी वेगळ्याच जगात होतो. ती माझ्यासाठी एक परीक्षाच होती", असं परेश रावल यांनी सांगितलं.
परेश यांनी यावेळी सलमाननं केलेल्या मदतीचा आवर्जून उल्लेख केला. “मी त्या वेळी काम करत नसतो तर कदाचित मी दु:खानं कोसळलो असतो. सलमान आणि त्याचे वडील सलीम साहेब माझे खूप मोठे आधारवड आहेत. सलमाननं मला त्यावेळी सावरलं. त्यानं मला कामात गुंतवून ठेवलं नसतं तर मी तो दिवस कसा व्यतित केला असता याची कल्पना देखील मी करू शकत नाही", असं परेश रावल यांनी सांगितलं.