लोकप्रिय अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा यांनी २४ सप्टेंबर रोजी लग्न केलं होतं. उदयपूरमध्ये दोघांचा शाही विवाहसोळहा पार पडला. एकमेंकाना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. पण, लग्नापर्यंत दोघांनीही आपले नाते गुपित ठेवले होते. मे महिन्यात साखरपुडा करुन त्यांनी सर्वांना धक्का दिला होता. तेव्हापासून चाहत्यांना त्यांची लव्हस्टोरी कशी सुरु झाली हे जाणून घेण्याची इच्छा आहे. तर या दोघांची भेट नेमकी कुठे झाली आणि त्यांची लव्हस्टोरी लग्नापर्यंत येऊन कशी पोहोचली हे जाणून घेऊया.
आता नुकतेच एका मुलखतीमध्ये परिणीती चोप्राने राघव चड्ढांबरोबर तिच्या पहिल्या भेटीची गोष्ट सांगितली. लंडनमध्ये परिणीती आणि राघव यांना त्यांच्या संबंधित क्षेत्रातील चांगल्या कामाबद्दल सन्मानित करण्यात आले होते. या अवॉर्ड फंक्शननंतर राघव आणि परिणीतीने टीमच्या इतर सदस्यांसोबत नाश्ता केला आणि तेव्हाच ती आम आदमी पक्षाचे नेते असलेल्या राघव यांच्या प्रेमात पडली.
परिणीती म्हणाली, "मला आठवतंय की प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही सकाळी नाश्त्यासाठी भेटलो. मी कदाचित अर्धा तास त्याच्यासोबत बसले होते आणि मला तेव्हाचं वाटलं की हा तोच व्यक्ती असणार आहे ज्याच्याशी मी लग्न करेल. वय किती आहे, लग्न झाले आहे की नाही, त्यांच्याबद्दल मला काहीच माहीत नव्हतं. हॉटेलच्या खोलीत जाताच मी गुगलवर त्यांच्याबद्दलची सर्व माहिती सर्च केली आणि बरं झालं ते अविवाहित होते. तेथून आमचं बोलणं सुरू झालं". पुढे राघवचे कौतुक करत ती म्हणाली, मी अशा व्यक्तीशी लग्न केलं आहे, जो मला दररोज प्रेरित करतो'.
परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा यांच्या जोडीला चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं आहे. तर परिणीतीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती अक्षय कुमारसोबत 'मिशन रानीगंज: द ग्रेट इंडियन रेस्क्यू' या चित्रपटात दिसली होती. आता ती लवकरच 'अमर सिंह चमकीला'मध्ये दिलजीत दोसांझसोबत दिसणार आहे. हा चित्रपट पंजाबमधील एका प्रसिद्ध गायकाच्या जीवनावर आधारित आहे.