अभिनेत्री परिणीती चोप्राने विविध भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. आता तिचा 'जबरिया जोडी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत मुख्य भूमिकेत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा दिसणार आहे. ही जोडी यापूर्वी 'हसी तो फसी' सिनेमात झळकली होती आणि त्यातील या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपट भावली होती. आता ही जोडी 'जबरिया जोडी'मध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लखनौ आणि त्याजवळच्या भागात करण्यात येत आहे.
'जबरिया जोडी' चित्रपट 'पकडवा शादी' या बिहारी कथेवर आधारित आहे. त्यामुळे सिनेमाचे काही चित्रीकरण बिहारमध्ये झाले आहे. बिहारमध्ये मुलांना पकडून त्यांना बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्तीने लग्न लावून देण्याच्या घटना घडतात. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अलीकडेच परिणीतीला लखनऊमधील एका गोठ्यात जावे लागले. गोठा म्हटले की बरेच जण नाक मुरडतात. तेथील शेणाचा वास अनेकांना सहन होत नाही. पण परिणिताला या गोठ्यामध्ये गायी-म्हशींसोबत १३ तास घालवावे लागले. खरे तर स्टुडिओमध्येही कृत्रिम वातावरण तयार करून याचे चित्रीकरण करता आले असते; पण हा सीन एकदम अस्सल वाटायला हवा अशी निर्मात्यांची अपेक्षा होती. त्यामुळे गोठ्यामध्ये काही बदल करण्यात आले होते.मात्र सिद्धार्थ आणि परिणीतीने चित्रीकरण पूर्ण केल्यानंतर मगच आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी ब्रेकही काही मिनिटांचेच घेतले. निर्मात्यांनीही या दोघांसाठी गोठ्यातच सर्व काही व्यवस्था केली होती. या चित्रपटात परिणितीने अॅक्शन सीनही दिले आहेत. आता पुन्हा एकदा परिणीती व सिद्धार्थची रुपेरी पडद्यावरील केमिस्ट्री प्रेक्षकांना भावते का, हे पाहावे लागेल.