Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदकांना गवसणी घालून भारताची मान उंचावत मनू भाकरने 'न भुतो' पराक्रम करून दाखवला. मनूने या ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्य पदकांवर नाव कोरल्याने तिच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर २२ वर्षीय मनू भाकर भारतात परतली. बॉलिवूड अभिनेा जॉन अब्राहमने मनू भाकरची भेट घेत तिचं कौतुक केलं. याशिवाय तिच्यासाठी खास पोस्टही शेअर केली.
जॉन अब्राहमने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन मनू भाकरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने "मनू भाकर आणि तिच्या कुटुंबाला भेटण्याची संधी मिळाली. तिने भारताची मान उंचावली आहे", असं कॅप्शन दिलं आहे. पण, जॉनने शेअर केलेल्या या फोटोमधील एक गोष्ट मात्र नेटकऱ्यांना खटकली आहे. त्याच्या या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्याला चांगलंच सुनावलं आहे. या फोटोमध्ये मनू भाकरच्या गळ्यात एक मेडल दिसत आहे. तर दुसरं मेडल हे जॉनने त्याच्या हातात पकडल्याचं दिसत आहे. यामुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
"तू त्या मेडलला हात नाही लावला पाहिजे", "दुसरं कोणीतरी जिंकलेल्या मेडलला हात लावण्याचा तुला अधिकार नाही", "याने का मेडल पकडलं आहे?", "मेडल असं कोणालाही देऊ नकोस मनू...ही तुझी मेहनत आहे", "ऑलिम्पिक पदकाचा आदर करायला शिका...त्याला हात लावण्याचा तुला काहीच अधिकार नाही", अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
मनू भाकरची ऑलिम्पिक २०२४ मधील कामगिरी
२८ जुलै, रविवार : या दिवशी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला मनू भाकरने पहिले पदक मिळवून दिले. १० मी. महिलांच्या पिस्तूल प्रकारात तिने कांस्य पदक पटकावले. रविवारी दुपारी झालेल्या अंतिम फेरीत भारताच्या मनूने कांस्य पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. तर कोरियन खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले. या प्रकारात पदक जिंकणारी मनू ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली.
३० जुलै, मंगळवार : मनू भाकरने सरबजोत सिंगच्या साथीने कांस्य पदक जिंकून एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू बनण्याचा मान पटकावला. मनू आणि सरबजोतने शूटींगच्या १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात कांस्य पदकावर निशाणा साधला.
३ ऑगस्ट, शनिवार : २५ मीटर महिलांच्या पिस्तूल प्रकारात पदक जिंकून मनू भाकरने पदकाची हॅटट्रिक मारली. तिने शुक्रवारी ५९० गुणांसह अंतिम फेरीचे तिकीट मिळवले होते. शनिवारी झालेल्या अंतिम फेरीत मनूला अपयश आल्याने पदकापासून एक पाऊल दूर राहावे लागले.