झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित 'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटात सयाजी शिंदे, नागराज पोपटराव मंजुळे, आकाश ठोसर आणि सायली पाटील हे प्रमुख भूमिकेत असले तरी असेही काही कलाकार आहेत ज्यांच्या अभिनय शैलीने ही बिर्याणी अधिकच लज्जतदार बनली आहे. 'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटात महाराष्ट्राच्या विविध भागांतील कलाकारांनी काम केले आहे. ज्याप्रमाणे बिर्याणी रुचकर बनवण्यासाठी त्यात विविध जिन्नस वापरले जातात, ज्याची प्रत्येकाची एक खासियत असते. तशीच खासियत असलेले महाराष्ट्रातील कलाकार 'घर बंदूक बिरयानी' मध्ये दिसणार आहेत. या चित्रपटात साताऱ्याची श्वेतांबरी घुडे, बार्शीचा विठ्ठल काळे, नागपूरचा नीरज जमगाडे- मायकल, सोलापूरचा सोमनाथ अवघडे, नांदेडचा संतोष व्हडगीर (नाईक), भंडाराचा ललित मटाले, औरंगाबादचा प्रवीण डाळिंबकर, यवतमाळचा किरण ठोके, सोलापूरचा सुरज पवार, नांदेडचा किशोर निलेवाडी, नागपूरचा प्रियांशू छेत्री- बाबू, पुण्याचा सुभाष कांबळे, इचलकरंजीचा गिरीश कोरवी, औरंगाबादचा चरण जाधव, बीडचा अशोक कानगुडे, जळगावचा आशिष खाचणे असे कलाकार आहेत आणि या सगळया जिन्नसांमुळे ही मुरलेली बिर्याणी एकदम रुचकर होणार आहे. येत्या ७ एप्रिल रोजी प्रेक्षकांना या बिर्याणीची चव चाखता येणार आहे.
या कलाकारांबद्दल नागराज मंजुळे म्हणतात, ‘’ या सगळ्या कलाकारांचे काम मी पाहिले आहे. काहींसोबत काम केले आहे. हे सगळेच कलाकार खूप मेहनती आहेत. सर्वांनीच खूप चांगले काम केले आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील हे कलाकार असल्याने प्रत्येकाची एक वेगळी शैली आहे. त्यामुळे ही बिर्याणी अधिकच चविष्ट होणार आहे.''