'मैत्रीसाठी काहीही...' असे म्हणणारे अनेकजण जेव्हा नोकरी धंद्याला लागतात, तेव्हा मैत्रीच्या आणाभाका ते कधीच मागे विसरतात. भविष्याच्या तरतुदीसाठी आपापल्या रस्त्यावर लागलेले सर्व मित्र मग केवळ आठवणीच्या कुपीत किंवा एका फोटोच्या चौकटीतच सीमित राहतात. अशा या सर्व मित्रांना पुन्हा एकदा एकत्र येण्यास प्रवृत्त करणाऱ्या 'पार्टी' या चित्रपटाचा प्रिमिअर लोकमतच्या सहयोगाने कलाकारांच्या उपस्थितीत नुकताच आयोजित करण्यात आला होता. आयुष्य हे एखाद्या पार्टीसारखं जगणाऱ्या कॉलेजमधल्या तरुण तरुणींची गोष्ट सांगणाऱ्या या सिनेमात नव्या दमाच्या कलाकारांची फौज आहे. युट्युबवर गाजत असलेल्या 'काळजात घंटी वाजते', 'भावड्या' या गाण्यांना प्रेक्षकांनी विशेष दाद दिली. आपल्या सहजसुंदर अभिनयाने मराठीचा छोटा आणि मोठा पडदा गाजवणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी, 'दिल दोस्ती दुनियादारी' या लोकप्रिय मालिकेतील सुव्रत जोशी व मंजिरी पुपाला, मराठी व हिंदी मालिकांमधून झळकलेला स्तवन शिंदे आणि रोहित हळदीकर यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सचिन दरेकर दिग्दर्शित या 'पार्टी'त अवधूत गुप्ते, प्रशांत लोके, अमितराज आणि गुरु ठाकूर या त्यांच्या जुन्या मित्रांनीदेखील त्यांना मोलाचा हातभार लावला आहे. बोरीवली पूर्व भागात राहणाऱ्या या साऱ्या मित्रांनी मराठी चित्रपटसृष्टीत विशेष स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे या सर्व दिग्गजांचा 'पार्टी' हा गेटटुगेदर सिनेमा आहे. आपापल्या आयुष्यात आणि संसारात गुंग झाल्यानंतर मागे राहून गेलेल्या जुन्या मित्रांची आठवण हा सिनेमा करून देतो.
गिरीश खत्री- आयुष्यातील ध्येयाचे एक एक टप्पे पार करताना कॉलेजच्या आठवणी धूसर होत जातात. हा सिनेमा पाहून या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या. मी व माझ्या मित्रांनी कॉलेजमध्ये केलेली धमाल आठवली. यातील गाणीसुद्धा सुंदर असून मनावरची मरगळ दूर करण्यासाठी प्रत्येकाने हा चित्रपट एकदा तरी पाहावा असाच आहे.
राजेंद्र अनासपुरे- हा सिनेमा प्रेक्षकांसाठी कम्प्लीट इंटरटेंटमेंट पॅकेज आहे. उच्च जीवनमान जगण्याच्या स्पर्धेत मागे राहून गेलेल्या मैत्रीचे किस्से हा सिनेमा पाहताना आठवत राहतात. धमाल कॉमेडी, खुमासदार संवाद आणि आपलीशी वाटणारी कथा या गोष्टी मनाचा ताबा घेतात.