सध्या सगळ्यांना वेध लागले आहेत ते होळी सणाचे. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण होळी आणि रंगपंचमीची तयारी करत आहे. यात कलाकार मंडळी सुद्धा मागे नाहीत. कलाविश्वात अनेकांच्या घरी होळी पार्टीचं आयोजन केलं जातं. अनेक कलाकार एकत्र येऊन रंगपंचमी खेळतात. मात्र, यात पारु फेम अभिनेत्री अपवाद आहे. गेल्या काही वर्षांपासून पारुने म्हणजेच शरयू सोनावणे (Sharayu sonawane) हिने रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळणं कायमचं बंद केलं आहे. मात्र, तिचं असं वागण्यामागे खास कारण असल्याचं तिने सांगितलं आहे.
शरयू लहान असताना रंगपंचमीला खूप मज्जामस्ती करायची. मात्र, हानिकारक रंगांमुळे त्वचेला आणि खासकरुन मुक्या जनावरांना होणारा त्रास तिच्या लक्षात आला. त्यानंतर तिने रंग खेळणं कायमच बंद केलं.
"लहानपणी जसं मनाला येईल तसं होळी खेळायचे. कुठचे ही रंग वापरायचो, कोणत्याही पाण्यात होळी खेळायचो. पण जेव्हापासून मला कळायला लागेल तेव्हापासून होळी खेळणं मी बंद केलय. माझ्या घरी माझा एक पेट आहे त्याला बघून समजायला लागले की प्राण्यांना रंगांचा त्रास होतो. माझ्या पेटला त्रास झाला तर तो मला सहन नाही होणार नाही. त्यामुळे मी होळी खेळणं बंद केलं, असं शरयू म्हणाली.
पुढे ती म्हणते, "पण एक रंगाचा टिळा मी नक्की लावते. मी सर्वाना सांगू इच्छिते की होळी खेळताना तुम्ही प्राण्यांची काळजी घ्या. त्यांना रंग लावू नका." दरम्यान, शरयू जरी होळी खेळत नसली तरी सुद्धा यंदा मालिकेत पारु रंग खेळताना दिसणार आहे. मात्र, मालिकेच्या सेटवर नैसर्गिक रंगांचा वापर करण्यात येणार असल्यांचही तिने सांगितलं.