मुंबई- आशुतोष गोवारीकर यांच्या ‘पानीपत’ या चित्रपटाने सगळ्यांची उत्सुकता ताणली आहे. अर्जुन कपूर, क्रिती सॅनन, संजय दत्त स्टारर या पीरियड ड्रामाचे शूटींग लवकरच सुरु होणार होते. पण आता या मार्गात अनेक अडचणी दिसू लागल्या आहेत.‘मोहेंजोदडो’ दणकून आपटल्यानंतर आशुतोष गोवारीकर हे नाव अनेकांच्या विस्मृतीत गेले होते. पण ‘पानीपत’ची घोषणा झाली अन् हे नाव पुन्हा चर्चेत आले. क्रिती सॅनॉन आणि अर्जुन कपूर यांच्याही आशा या प्रोजेक्टने पल्लवित झाल्या. कारण या प्रोजेक्टच्या निमित्ताने त्यांच्यासमोर एका लार्ज स्केल पीरियड ड्रामामध्ये काम करण्याची संधी चालून आली. पण आता कदाचित या सगळ्या आशांवरून पाणी फिरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सूत्रांचे मानाल तर ‘पानीपत’ हा प्रोजेक्ट सध्या अनेक आर्थिक अडचणींचा सामना करतोय. त्यामुळे लवकरचं सुरु होणारा हा प्रोजेक्ट तूर्तास खोळंबला आहे. त्यातच सिनेमॅटोग्राफर किरण दियोहंस यांनी या प्रोजेक्टमधून अंग काढून घेतल्याचीही खबर आहे. विशेष म्हणजे, ते पुन्हा परत येण्यास तयार नसल्याचेही कळते आहे. आता त्यांच्याजागी दुस-या कुणाची वर्णी लागते की मेकर्स किरण यांचीच मनधरणी करतात, हे लवकरच कळेल. पण तूर्तास तरी हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट खोळंबलाय आणि निश्चितचं ही गोष्ट चाहत्यांच्या आनंदावर विरजण घालणारी आहे.‘पानीपत’मध्येअर्जुन कपूर मराठा योद्धा सदाशिवराव भाऊ पेशवे याची भूमिका साकारणार आहे. संजय दत्त अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेत दिसणार आहे तर क्रिती सदाशिवराव यांची दुसरी पत्नी पार्वतीबाईची भूमिका जिवंत करणार आहे. या चित्रपटात अर्जुन कपूर व संजय दत्त तलवारबाजी करताना दिसणार आहेत. क्रितीही यासाठी तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतेयं.इतिहासात पानिपतला रणभूमी संबोधले जाते. त्याला कारण आहे या शहराच्या आसपास झालेली तीन युद्धे. या तिन्ही युद्धांमुळे भारतीय इतिहासाला वेगळे वळण मिळाले व असेही म्हणले जाते की ही युद्धे झाली नसती अथवा युद्धाचा निर्णय जर वेगळा असता तर आजचा भारत नक्कीच वेगळा दिसला असता. पहिले युद्ध १५२६ मध्ये दिल्लीचा सुलतान इब्राहीम लोधीआणि बाबर मध्ये लढले गेले. बाबरच्या छोट्या परंतु शिस्तबद्ध सेना आणि तोफा यांच्या बळावर लोधीच्या एक लाखापेक्षा मोठ्या फौजेचा लीलया पराभव केला आणि भारतात मुघल सत्तेचा पाया घातला. १५५६ मध्ये हेमू आणि मुघलांच्यात दुसरे युद्ध लढले गेले. यावेळी पुन्हा मुघलांची सरशी झाली व भारतात मुघलांच्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब झाले. १७६१ रोजी मराठे सदाशिवराव पेशवे आणि अफगाण घुसखोर अहमद शाह अब्दाली यांच्यात तिसरे युद्ध झाले. या युद्धात सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाचपर्यंतच्या एका दिवसाच्या अल्पावधीत दोन्ही बाजूंची दीड लाख माणसे आणि ऐंशी हजार जनावरे मेल्याचे दुसरे उदाहरण नाही. या भीषण युद्धात मराठे पराभूत झाले,पण अब्दालीचीही मोठी हानी झाली.
‘पानीपत’च्या मार्गात अडचणींचा डोंगर? रखडले चित्रीकरण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 6:48 AM