Pathaan Actress Deepika Padukone : दीपिका पादुकोणसाठी २५ जानेवारी ही तारीख व ‘प’ हे अक्षर पुन्हा एकदा लकी ठरलं आहे. दीपिकाचा पद्मावत व पठाण हे दोन्ही सिनेमे २५ जानेवारीला रिलीज झालेत आणि दोन्ही ब्लॉकबस्टर ठरलेत. पाच वर्षांनंतर आपला सिनेमा हिट झाला, याचा आनंद तर होणारच. सध्या दीपिका हाच आनंद साजरा करतेय. सोबत हा तिच्यासाठी भावुक क्षण आहे. ‘पठाण’ला तुफान प्रतिसाद मिळतोय आणि हे पाहून दीपिका भावुक झाली. तिला अश्रू अनावर झालेत.
‘पठाण’च्या प्रेस मीटमध्ये दीपिकाला अश्रू आवरता आले नाहीत. लोकांचं प्रेम पाहून तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले. ‘पठाण’च्या टीमने नुकतीच एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. यावेळी शाहरुख खान, दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम आणि चित्रपटाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद उपस्थित होते.
चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव, चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद याबद्दल सर्वजण भरभरून बोलले. दीपिकाची बोलण्याची वेळ आली तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं. या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून ती भावूक झाल्याचं तिने सांगितलं. पाणावलेल्या डोळ्यांनी तिने चाहत्यांचे आभार मानलेत.
“आमच्या सिनेमाला जो काही प्रतिसाद मिळतोय, तो पाहून मी भारावले आहे. आतापर्यंत आम्ही चित्रपटाचे स्क्रीनिंग्स करत होतो. इतके दिवस आम्ही घरातून बाहेर पडलो नव्हतो. अनेक व्हिडीओज आमच्या पाहण्यात येत होते. पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता पहिल्यांदाच आम्ही चाहत्यांशी संवाद साधतोय, त्याचा आनंद आहे. प्रामाणिकपणे सांगायचं तर, आम्ही विक्रम मोडायला आलोत, असं आम्हाला अजिबात वाटत नाही. आम्ही फक्त एक चांगला सिनेमा बनवण्याचा प्रयत्न केला. शाहरूखने मला माझा पहिला सिनेमा ओम शांती ओमच्या वेळी ही गोष्ट शिकवली होती. तेव्हा मला सिनेमाबद्दल फार काही माहित नव्हतं. शाहरूखसोबत काम करण्याचा अनुभव एकदम अनोखा असतो. त्याच्यासोबत काम करताना मजा येते. सेटवर आनंदी वातावरण असतं. कदाचित याचंच प्रतिबिंब पडद्यावर दिसतं आणि प्रेक्षक चित्रपटाशी कनेक्ट होतात. शाहरूखने मला ओम शांती ओममध्ये संधी दिली नसती तर कदाचित मी आज इथे नसते,” असं म्हणताच तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले. कार्यक्रमाच्या होस्टने इतकं भावुक होण्याचं कारण विचारलं. पण दीपिकाने उत्तर देणं टाळलं.