Pathan Advance Booking : बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करतोय. येत्या २५ जानेवारीला शाहरूखचा ‘पठाण’ हा सिनेमा रिलीज होतोय आणि रिलीजआधीच या चित्रपटानं धूम केली आहे. देशात ‘पठाण’चं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे आणि या ॲडव्हान्स बुकिंगला चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळताना दिसतोय. ताज्या रिपोर्टनुसार, ‘पठाण’ची १.१७ लाखांवर तिकिटं कधीच विकली गेली आहे. होय, ट्रेड ॲनालिस्ट तरण आदर्श यांनी ॲडव्हान्स बुकिंगचे ताजे आकडे शेअर केले आहेत. गुरुवारी रात्री ११ वाजेपर्यंत आयनॉक्समध्ये ‘पठाण’ची ५१ हजार तिकिटं विकली गेलीत. पीव्हीआरमध्ये ३८ हजार, सिनेपोलिसमध्ये २७ हजार तिकिटं विकली गेलीत.
पहिल्या दिवशी कमावणार इतके कोटी...जाणकारांच्या मते, ‘पठाण’ रिलीजच्या पहिल्या दिवशीच ३९ ते ४१ कोटींचा बिझनेस करू शकतो. अर्थात ‘पठाण’ने पहिल्या दिवशी ४० कोटी कमावले तरीही हा सिनेमा शाहरूखच्या हॅपी न्यू ईअर या बिग ओपनर सिनेमाचा मुकाबला करू शकणार नाहीये. हॅपी न्यू ईअर हा शाहरूखचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा ओपनर सिनेमा आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी ४४ कोटींची कमाई केली होती.
विदेशातही ‘पठाण’चा डंकादरम्यान भारतासह अन्य देशातही पठाणचं जबरदस्त ॲडव्हान्स बुकिंग सुरू आहे. जर्मनीत ‘पठाण’चं ॲडव्हान्स बुकिंग कधीच सुरू झालं आहे. येथे ॲडव्हान्स बुकिंगची सर्व तिकिटं विकली गेली आहेत. जर्मनीत 28 डिसेंबर रोजी ‘पठाण’च्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली होती. पहिल्या दिवसाची सर्व तिकिटं विकली गेल्याची माहिती समोर येत आहे. बर्लिन, एसेन, डॅमटोर, हार्गर्ब, हनोवर, म्युनिख आणि ऑफनबॅक इथले सात थिएटर्स ओपनिंग डेसाठी हाऊसफुल झाले आहेत. भारतासोबतच जर्मनीतही पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. ॲडव्हान्स बुकिंगचे आकडे पाहता प्रेक्षकांमध्ये शाहरुखच्या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता असल्याचं कळतंय. युएई, ऑस्ट्रेलिया, अमेरिका इथेही ‘पठाण’ची क्रेझ पाहायला मिळतेय.
‘पठाण’द्वारे शाहरूखचं चार वर्षानंतर कमबॅक होतंय. मध्यंतरी तो ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला. आता आगामी ‘पठाण’ या चित्रपटातून तो धमाकेदार कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. अर्थात प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादात सापडला आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यातील एका दृश्यात अभिनेत्री दीपिका पदुकोणने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्यामुळे हा वाद निर्माण झाला. ‘पठाण’या चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या भूमिका आहेत.