Join us

स्वत:च्या जिद्दीने स्थान मिळवणारा पाटील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 06:00 IST

समाजातील दाहक वास्तवावर प्रकाशझोत टाकणाऱ्या चित्रपटांना प्रेक्षकांनी नेहमीच चांगला प्रतिसाद दिला आहे. मराठी चित्रपट हा त्याच्या वेगळ्या आशय-विषयांमुळे ओळखला जातो.

ठळक मुद्देया चित्रपटात शिवाजी पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास मांडला आहे

समाजातील दाहक वास्तवावर प्रकाशझोत टाकणाऱ्या चित्रपटांना प्रेक्षकांनी नेहमीच चांगला प्रतिसाद दिला आहे. मराठी चित्रपट हा त्याच्या वेगळ्या आशय-विषयांमुळे ओळखला जातो. स्वतच्या जिद्दीनं स्थान मिळवणारे, यश मिळवणारे अनेकजण असतात. अशाच एका जिद्दीची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न आगामी 'पाटील' या मराठी चित्रपटातून केला जाणार आहे. स्टार क्राफ्ट मनोरंजन प्रा.लि. सचिकेत प्रोडक्शन्स, शौभम सिनेव्हिजन्स प्रा.लि निर्मित 'पाटील.. ध्यास स्वप्नांचा' हा चित्रपट २६ आॅक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या टीमने लोकमत ऑफिसला भेट दिली आणि चित्रपटाविषयी चर्चा केली. 

या चित्रपटात शिवाजी पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास मांडला आहे. शिवाजी लोटन पाटील, वर्षा दांदळे, भाग्यश्री मोटे, नरेंद्र देशमुख, प्रतिमा देशपांडे, सुरेश पिल्ले, कपिल कांबळे, एस.आर.एम एलियन, यश आदि कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. विशेष भूमिकेत डॉ.जगदीश पाटील (कोकण आयुक्त) दिसणार आहेत.

चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष मिजगर सांगतात, एका हळव्या प्रेमकथेची किनार दाखवताना शिवाजी पाटील यांचा भूतकाळ, त्यांचा संघर्षाचा काळ, त्यांनी पचवलेले दु:ख व त्यानंतरही उभे राहण्याची त्याची असलेली जिद्द सामाजिक द्वंद्वातून आपल्यासमोर येणार आहे. अशाच एका द्वंद्व कथेचा नायक... शिवाजी कर्तव्य आणि प्रेम यांचा समन्वय साधू पाहतोय.. स्वप्न पहायला पैसे लागत नाहीत आणि स्वप्न पूर्ण करायला पण पैसे लागत नाहीत लागते ती फक्त मेहनत आणि जिद्द. 

या चित्रपटाची कथा,पटकथा आणि दिग्दर्शन संतोष राममीना मिजगर यांचे आहे. मनोरंजक मूल्यांचा समावेश करत पाटील चित्रपटातील प्रेरणादायी कथानकाला योग्य अशा गीत संगीताची जोड देण्यात आली आहे. चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत. यातील पाटील पाटील हे धडाकेबाज गाणं आनंद शिंदे, आदर्श शिंदे यांनी गायलं असून तुला पाहून हे रोमँटिक गीत बिष्णू मोहन, बेला शेंडे यांच्या गायकीने खुललं आहे. 'सूर्य थांबला' या मनस्पर्शी गीताला सुखविंदर सिंग व रेहा विवेक यांचा स्वर लाभला आहे. राधेला पाहून व धिन ताक धिन या ठेका धरायला लावणाऱ्या गीतांना गणपत मिजगर, बाबुल सुप्रियो, श्रेया घोषाल यांनी स्वरबद्ध केलं आहे. चित्रपटाची गीते गुरु ठाकूर, समीर, सुरेश पांडा-जाफर, संजय वारंग, एस.आर.एम यांनी शब्दबद्ध केली असून संगीत आनंद-मिलिंद, सोनाली उदय, प्रभाकर नरवाडे, डी.एच.हारमोनी, एस.आर.एम.एलियन यांनी दिले आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे.  

टॅग्स :श्रेया घोषाल