आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची पत्नी अन्ना कोनिडेला यांनी रविवारी तिरुमला मंदिरात त्यांच्या डोक्यावरील संपूर्ण केस दान केलेत. मंदिरात मुंडन करतानाचे त्यांचे फोटो समोर आलेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने हा निर्णय त्यांचा मुलगा सुखरूप परतल्याच्या आनंदात घेतला आहे.
मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि अन्ना कोनिडेला यांच्या मुलासोबत मोठी दुर्घटना घडली होती. आगीच्या विळख्यात अडकल्याने तो भाजला होता. ज्यातून त्याची आई अन्ना कोनिडेला यांनी तिरुमला मंदिरात मुलाच्या सुरक्षेसाठी जर मुलगा सुखरूप ठीक झाला तर मंदिरात मी माझे संपूर्ण केस दान करेल असं त्यांनी नवस केला होता.
सिंगापूरात घडली होती दुर्घटना
उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि अन्ना कोनिडेला यांचा मुलगा मार्क शंकर अलीकडेच सिंगापूरमध्ये एका समर कॅम्पमध्ये सहभागी होण्यासाठी गेला होता. ज्याठिकाणी ८ एप्रिलला आग लागली होती. या घटनेत मार्क शंकर थोडक्यात बचावला होता परंतु आगीत त्याचे हात-पाय भाजले होते. आता तो पूर्णपणे ठीक आहे. मुलावर आलेले संकट पाहून आई अन्ना कोनिडेला यांनी त्याच्या सुरक्षेसाठी तिरुमला मंदिरात नवस केला होता. जो त्यांनी रविवारी पूर्ण केला.
मुलाला घट्ट मिठीत घेऊन आला पवन कल्याण; शाळेत आगीच्या विळख्यात अडकला होता ८ वर्षीय मार्क
जनसेना पार्टीनं जारी केले निवेदन
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या जनसेना पार्टीकडून एक पत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यात पक्षाने म्हटलं की, 'परंपरा लक्षात ठेवून अन्नांनी पद्मावती कल्याण कट्ट्यावर आपले केस अर्पण केले आणि विधींमध्ये भाग घेतला. अन्ना कोनिडेला यांनी केस अर्पण केल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. अन्ना कोनिडेला यांनी तिरुमलाच्या भगवान व्यंकटेश्वर यांच्यावर श्रद्धा ठेवली. मंदिरातील श्री वराह स्वामी दर्शनानंतर अन्ना यांनी पद्मावती कल्याण कट्टात आपले केस दान केलेत.