Pawankhind : मराठेशाहीच्या इतिहासातील रक्तरंजित आणि अजोड पराक्रम व बलिदानाची यशोगाथा सांगणारा ‘पावनखिंड’ (Pawankhind) हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि चित्रपटावर प्रेक्षकांच्या अक्षरश: उड्या पडल्या. शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच 18 फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांचं हे प्रेम पाहून अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) भावूक झाला आहे. चिन्मयने या चित्रपटात छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली आहे.अभिनेता चिन्मय मांडलेकरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. सोबत ‘पावनखिंड’ ओटीटीवर प्रदर्शित न करता चित्रपटगृहांमध्येच रिलीज करण्यामागचं कारणंही सांगितलं आहे.
‘गेल्या दोन वर्षात अनेकांनी विचारलं ‘पावनखिंड’ ओटीटीवर का प्रदर्शित करत नाही? हे आहे त्याचं उत्तर. स्वास्थ्यासाठी सामाजिक अंतर राखायलाच हवं. पण सामाजिक स्वास्थ्यासाठी लोकांनी एकत्र येऊन काहीतरी साजरं ही करायला हवं. प्रेक्षकहो तुम्ही ‘पावनखिंड’ साजरा करताय. आम्ही धन्य झालो...,’ अशी भावनिक पोस्ट चिन्मयने शेअर केली आहे.चिन्मयने या पोस्टसोबत शेअर केलेला व्हिडीओ पुण्याच्या राहुल चित्रपटगृहातील आहे. या चित्रपटगृहात चित्रपट पाहायला आलेल्या तरुणांनी एकत्र येत अंगावर शहारा आणणारे शिवगीत गात ‘पावनखिंड’ला प्रतिसाद दिला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
‘पावनखिंड’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षक या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद देत आहेत. चित्रपटगृहाच्या बाहेर हाऊसफुलचे बोर्ड लावण्यात आले आहेत. फर्स्ट डे फर्स्ट शोपासूनच प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळालेल्या ‘पावनखिंड’ने गेल्या दहा दिवसांत कोट्यवधी रूपयांचा गल्ला जमवला आहे.
दिग्गज ट्रेंड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या कमाईची आकडेवारी शेअर केली आहे. त्यानुसार, ‘पावनखिंड’ने दुसऱ्या आठवड्यातही आपली घोडदौड कायम ठेवली आहे. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने तब्बल 12 कोटी 17 लाख रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यात शुक्रवारी या चित्रपटाने 1.02 कोटींचा बिझनेस केला. शनिवारी 1.55 कोटी तर रविवारी 1.97 कोटींची कमाई केली. म्हणजेच दहा दिवसांत या चित्रपटाने एकूण 16.71 कोटींचा बिझनेस केला.दिग्पाल यांनी तरण आदर्श यांचा ट्विटचा स्क्रीन शॉट सोशल मीडियावर शेअर करत, ‘हर हर महादेव’ असं कॅप्शन दिलं आहे.
‘पावनखिंड’ या चित्रपटात चिन्मय मांडलेकर याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर अजय पुरकर यांनी शूर वीर बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली आहे. समीर धर्माधिकारी, अंकित मोहन यांनी देखील या चित्रपटात जीव ओतला आहे.