Join us

या... इथे तुम्हाला फार समाधान लाभेल..., बाजीप्रभू साकारणाऱ्या अजय पुरकरांचे शिवभक्तांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 12:12 PM

Pawankhind fame Marathi Actor Ajay Purkar : बाजीप्रभूंची भूमिका साकारणाऱ्या अजय पुरकारांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

‘पावनखिंड’ (Pawankhind ) या चित्रपटाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या चित्रपटातील प्रत्येक कलाकरांच्या अभिनयाचं कौतुक झालं. पण यापैकी एका कलाकारावर सर्वाधिक कौतुकाचा वर्षाव झाला. हा कलाकार कोण तर बाजीप्रभूंची भूमिका साकारणारे अजय पुरकर(Ajay Purkar). होय, बाजीप्रभूंची भूमिका ते अक्षरश: जगले. या भूमिकेसाठी त्यांनी दोन वर्ष अपार मेहनत घेतली आणि त्यांची ती मेहनत पडद्यावर दिसली.

बाजीप्रभूंची व्यक्तिरेखा त्यांनी इतकी लिलया जिवंत केली की त्याला तोड नाही. बाजीप्रभूंची भूमिका साकारणाऱ्या याच अजय पुरकारांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. अजय पुरकर आणि त्यांच्या लेकीने नुकतंच विशालगडाचं दर्शन घेतलं. यादरम्यानचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओतून पुरकरांनी तमाम  शिवभक्तांना आणि सर्व मराठी मनाच्या माणसांना एक आवाहन केलं आहे.

अजय पुरकर म्हणाले...

 मी आणि माझी मुलगी सई आज (३० जुलै) विशाळगडाच्या दर्शनाला आलो आहोत. आता आम्ही नरवीर बाजीप्रभु देशपांडे आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांच्या समाधीजवळ आहोत. यानिमित्ताने पावनखिंडीचंही दर्शन घडलं. महाराष्ट्र भूषण शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांची आज प्रकषार्ने जाणीव होतेय तसेच आठवण येत आहे. ते आज आपल्यामध्ये असते तर १०१ वर्षांचे असते. बाबासाहेब पुरंदरे यांनी नाटकामधून आमच्या रक्ताच्या धामण्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पसरवले. ते नाटक म्हणजे  जाणता राजा . हे नाटक तोंड पाठ झालं होतं. तेव्हापासूनच मला शिवचरित्राची ओढ लागून राहिली होती. आज बाबासाहेबांचं कार्य मागे वळून पाहताना असं वाटतं की त्यांच्या हातून किती महान कार्य घडलेलं आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देश-विदेशामध्ये देखील ‘जाणता राजा’चे असंख्य प्रयोग झाले. त्यामुळेच जगभरात पसरल्या गेलेल्या मराठी माणसांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कायमचे कोरले गेले.  श्री शिवराज अष्टकाद्वारे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आठ चित्रपट करत आहोत. आज एक आवाहन मला शिवभक्तांना आणि सर्व मराठी मनाच्या माणसांना करायचं आहे. ते आवाहन म्हणजे आपण असंख्य लोक दरवर्षी किंवा जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा पावनखिंडीचं दर्शन घेता. यादरम्यान इथे बाजीप्रभु देशपांडे आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांची समाधी आहे. त्याचंही दर्शन अवश्य घ्या. या वीररत्नांचं दर्शन घेऊन तुम्हाला फार समाधान लाभेच. हेच आवाहन तुम्हा सगळ्यांना मी करत आहे. नक्की याचा विचार करा. पावनखिंडीचं दर्शन तसेच विशाळगडाचंही दर्शन आपल्याला घ्यायचं आहे हे लवकरात लवकर ठरवा. हरहर महादेव...., असं अजय पुरकरांनी व्हिडीओत म्हटलं आहे.

 

टॅग्स :अजय पुरकर