मराठेशाहीच्या इतिहासातील रक्तरंजित आणि अजोड पराक्रम व बलिदानाची यशोगाथा सांगणारा ‘पावनखिंड’ (Pawankhind ) हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि चित्रपटावर प्रेक्षकांच्या अक्षरश: उड्या पडल्या. शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच गेल्या 18 फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला उस्फुर्त प्रतिसाद मिळला. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरही बक्कळ कमाई केली.
या चित्रपटात चिन्मय मांडलेकर याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर अजय पुरकर यांनी शूर वीर बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली आहे. समीर धर्माधिकारी, अंकित मोहन यांनी देखील या चित्रपटात जीव ओतला आहे. आत्ता हा चित्रपट आठवण्याचं कारण म्हणजे, चित्रपटाच्या सेटवरचे मेकिंग व्हिडीओ. होय, चित्रपटात रायाजी बांदल यांची भूमिका साकारणारा अभिनेता अंकित मोहन (Ankit Mohan) याने ‘पावनखिंड’च्या सेटवरचे काही बीटीएस व्हिडीओ शेअर केले आहेत.
‘पावनखिंड’चं शूटींग कसं झालं, ते या व्हिडीओत दिसतेय. खाली गुडघाभर पाणी, वरून पाऊस असं खिंडीतील शूटींग 12 दिवस सुरू होतं. यादरम्यानचा एक व्हिडीओ अंकितने शेअर केला आहे. ‘सगळ्या गोष्टींसाठी त्याग करावा लागतो... सोप्पं काही नसतं...,’ असं म्हणत त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे.
एक अन्य व्हिडीओ त्यानं शेअर केला आहे. जेव्हा आत आणि बाहेर आग पेटते..., असं कॅप्शन देत एक लढाईच्या दृश्याचा व्हिडीओ अंकितने शेअर केला आहे.
‘पावनखिंड’तील भूमिकेसाठी किती घाम गाळावा लागला, याची झलकही त्याने एका व्हिडीओतून दाखवली आहे.
अॅक्शन सीन्स पडद्यावर पाहताना सोपे वाटतात. पण प्रत्यक्षात ते करणं सोप्प नसतं. टीम यासाठी अथक मेहनत घेते, असं म्हणत एक लढाईच्या दृश्याचा व्हिडीओ अंकितने शेअर केला आहे.
अंकित मोहनने ‘फर्जंद’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. अंकित हा अमराठी असून हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा आहे. अंकितने ‘एमटीव्ही रोडीज’च्या चौथ्या पर्वात सहभागी होऊन छोट्या पडद्यावर एन्ट्री घेतली. स्टार प्लस वाहिनीवरील ‘महाभारत’ या मालिकेत अश्वात्माच्या भूमिकेतून तो घराघरांत लोकप्रिय झाला. याशिवाय झी टीव्हीवरील ‘कुमकुम भाग्य’ या मालिकेत त्याने साकारलेली आकाश ही व्यक्तिरेखाही बरीच गाजली होती. मिले जब हम तूम, नमक हराम, बसेरा, शोभा सोमनाथ की, तेरी मेरी लव्ह स्टोरीज, घर आजा परदेसी,बेगुसराय या मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे.