छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्याय सांगणारा ‘पावनखिंड’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. १८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांना खूपच भावला आहे. तिकीटबारीवरही या चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. आता हा पावनखिंड चित्रपट थिएटरनंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. २० मार्च रोजी हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
दिग्पाल लांजेकर यांनी दिग्दर्शन केलेले आणि चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी व अजय पूरकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट पावनखिंडच्या लढाई विषयी आहे, जी मराठा इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना म्हणून कोरली गेलेली आहे. यावर्षी मराठी इंडस्ट्रीसाठी सर्वात मोठा चित्रपट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पावनखिंडला चित्रपटगृहांमध्ये भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट फर्जंद आणि फत्तेशिकस्त नंतर शिवाजी महाराजांच्या प्रवासावर आधारित फ्रँचायझीमधील तिसरा भाग आहे.