अलीकडे एका ट्रोलरने दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या मुलीला अतिशय अश्लिल भाषेत धमकी दिली होती. यानंतर अनुरागने थेट ट्रोलरने लिहिलेल्या कमेंट्सचे स्क्रीनशॉट शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे याकडे लक्ष वेधले होते. माझ्या मुलीला धमक्या देत तुमच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या समर्थकांचे काय करायचे... प्लीज मला सांगा, असे ट्वीट अनुरागने केले होते. आता अनुरागने याप्रकरणी काही दिवसांपूर्वी एफआयआर दाखल केला आहे. त्यानेच ट्वीट करून याविषयी माहिती दिली होती. शिवाय या ट्वीटमध्ये त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले होते.
या सगळ्या प्रकारानंतर बॉलिवूडमधील अनेक मंडळीनी अनुरागच्या मुलीच्या बाबतीत करण्यात आलेले हे ट्वीट अतिशय चुकीचे असल्याचे म्हटले होते. पण आता एका अभिनेत्रीने अनुराग केवळ पब्लिसिटीसाठी हे सारे काही करत असल्याचे म्हटले आहे. अभिनेत्री पायल रोहतगीने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्याद्वारे तिने अनुरागला संदेश दिला आहे. तिने म्हटले आहे की, अनुराग लोकांमध्ये त्वेष निर्माण करत असून तो उगाचच ठरावीक वर्गाची बदनामी करत आहे. या व्हिडिओत तिने अनुरागला दारू कमी पिण्याचा आणि सायकोलॉजिस्टकडे जाण्याचा सल्ला देखील दिला आहे. तिने पुढे म्हटले आहे की, बॉलिवूडमध्ये पुरस्कार परत करणारी एक गँग सध्या कार्यरत असून अनुराग त्याच गँगचा सदस्य आहे. मोदींना लोकसभेत मिळालेले यश अनुरागला पचवता आलेले नाही आणि त्याचमुळे आपल्या मुलीची कथा सांगून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी लोकांमध्ये तो राग निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अनुराग आपल्या चित्रपटात बलात्कार, ड्रग्स यांसारख्या नकारात्मक गोष्टी दाखवतो. त्यामुळे लोक अधिक डिप्रेस्ड होतात.
पायलने या पोस्टसोबत लिहिले आहे की, आदरणीय अनुराग कश्यप मोदींविरोधात लोकांमध्ये राग निर्माण करण्यासाठी तुमच्या मुलीचा वापर करू नका. ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. नेटफ्लिक्सला चित्रपट बनवणाऱ्या लोकांमध्ये हिंदू धर्म आणि मोदी यांच्याविरोधात इतका द्वेष आहे की, त्यामुळेच ते अशाप्रकारच्या कथा रचून लोकांना सांगत आहेत. कोणी वडील आपल्या मुलीसोबत असे करू शकतो का?