बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलीन (Kalki Koechlin) आठवतेय का? 'ये जवानी है दिवानी' सिनेमात आदितीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कल्की सध्या काही धक्कादायक खुलासे केल्याने चर्चेत आहे. 'देव डी', 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' अशा अनेक सिनेमांमधून तिने अभिनयाची छाप पाडली आहे. मात्र तिच्यासाठी बॉलिवूडमध्ये काम करणं अजिबातच सोपं नव्हतं. तिला गोऱ्या रंगावरुनही हिणवलं गेल्याचा खुलासा तिने नुकताच एका मुलाखतीत केला. ड्रग्स घेतल्यामुळे इतकी गोरी आहे असं तिला बोललं गेलं होतं.
'द मेल फेमिनिस्ट'ला दिलेल्या मुलाखतीत कल्की म्हणाली, 'माझा गोरा रंग बघून लोकांना वाटायचं मी ड्रग्स घेते. इतकंच नाही तर गोऱ्या रंगामुळे माझ्या कॅरेक्टरवरही प्रश्न उपस्थित केले जायचे. गोरे लोक कॅरेक्टरलेस असतात असं समजलं जायचं. पण जेव्हा मी त्यांच्याशी तमिळमध्ये बोलायचे तेव्हा लगेच त्यांचा दृष्टिकोन बदलायचा.
कास्टिंग काऊचवरही केला खुलासा
मुलाखतीत कल्कीला कास्टिंग काऊचवर प्रश्न विचारण्यात आल. तेव्हा ती म्हणाली, 'मी सुद्धा कास्टिंग काऊचला बळी पडले आहे. एका दिग्दर्शकाने मला भूमिका ऑफर केली होती. ज्याच्या बदल्यात त्याने मला डिनरसाठी आमंत्रण दिले होते.
कल्की लवकरच जोया अख्तर आणि रिमा कागती यांच्या 'मेड इन हेवन 2' या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. यामध्ये तिच्यासोबत शोभिता धुलीपाला, जिम सरभ, अर्जुन माथुर यांचीही भूमिका आहे. 'मेड इन हेवन' चा पहिला भागही गाजला होता.