तिसरी घंटाराज चिंचणकरसर्वसाधारणपणे रहस्यनाट्यात रहस्याची उकल अगदी शेवटी केली जाते. परंतु असे न करताही, म्हणजे यातला कर्ताकरविता कोण हे आधीच स्पष्ट करून त्या नाटकातले गूढ कायम ठेवण्याचा विडा ‘अ परफेक्ट मर्डर’ या नाटकाने उचलला आहे. विशेष म्हणजे, नाटकाच्या ‘प्लॉट’ची अशी आखणी करूनही हे नाट्य कमाल पातळीवर रंगत गेले असून, रहस्यरंजनात गुंतवून ठेवणारा गूढ खेळ या नाटकातून मंचित केला गेला आहे.
रहस्यकथांचा बादशहा म्हणून सार्थ ओळख असलेल्या आल्फ्रेड हिचकॉक यांच्या एका मर्डर मिस्ट्रीचे मराठीकरण करत लेखक नीरज शिरवईकर यांनी हे नाट्य उभे केले आहे. त्यांचा हा प्रयत्न फळास आल्याचे एकूणच या नाट्यातून स्पष्ट होते. रहस्यात खिळवून ठेवण्याची किमया त्यांच्या लेखणीने यात केली आहे. त्यायोगे, त्यांची संहिता योग्य मार्गक्रमण करते. मात्र यातला संवादीपणा थोडा कमी करता आला असता, तरी चालण्यासारखे होते. नाटकातले रहस्य कायम ठेवत, किंबहुना ते सतत वाढत राहील या दृष्टीने त्यांनी चालवलेली लेखणी मात्र आश्वासक आहे. लेखनासोबतच त्यांनी या नाट्याचे नेपथ्यही विलक्षणरीत्या साकारले आहे. या आकर्षक नेपथ्याने हे रहस्यनाट्य अधिक खुलले आहे.
दिग्दर्शक विजय केंकरे यांनी रहस्याचा हा सगळा पट ठाशीवपणे उभा केला आहे. प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत व नेपथ्याचा अचूक उपयोग करून घेत त्यांनी हा खेळ मांडला आहे. या खेळात वावरणाऱ्या पात्रांना नाट्याच्या परिघात लीलया संचार करायला लावण्यात त्यांचे कसब दिसून येते. या नाट्यात रहस्याचा उलगडा आधीच होत असताना, नाटकाच्या अंतिम चरणापर्यंत रसिकांना खिळवून ठेवण्यात त्यांनी बाजी मारली आहे. मात्र यातल्या इन्स्पेक्टरच्या तोंडी ग्रामीण बोलीभाषा ठेवण्याचे प्रयोजन सहज पचनी पडत नाही. तसेच, काही प्रसंग लांबल्यासारखे वाटतात. कथानकाच्या प्रवाहात येणारी भावनांची आंदोलने अधिक ठोस प्रकट करणेही शक्य होते.
या नाटकाचे कथानक उघड केल्यास, यातले रहस्य हे रहस्य राहणार नाही. तरीही या नाटकाची थीम सांगायची झाली, तर पाच पात्रांत रंगवलेला पट असे म्हणता येईल. मीरा व निरंजन हे जोडपे, मीराचा पूर्वाश्रमीचा प्रियकर दिव्यजीत, नाटकात घडलेल्या घटनेचा तपास करणारे इन्स्पेक्टर घारगे व नावांच्या अदलाबदलीचा खेळ खेळणारा करमरकर यांच्यात हे नाट्य घडते आणि रहस्याच्या रंजकतेचा प्रवास सुरू होतो.
अशा प्रकारच्या नाट्यात, कलावंतांवर एकूणच नाटक सक्षमतेने पेलण्याची मोठीच जबाबदारी येऊन पडते. या नाटकातल्या कलाकारांनी मात्र त्याचे योग्य ते व्यवधान बाळगत हे नाट्य रंगवले आहे. यात पुष्कर श्रोत्रीचा निरंजन फर्मास वठला आहे. मनात चाललेल्या विचारांचा सुगावा बाहेर लागू न देता, कावेबाज आणि धूर्तपणाची पेरणी करणारे हे पात्र पुष्करने आत्मविश्वासाने साकारले आहे. सतीश राजवाडे यांच्या वाट्याला इन्स्पेक्टर घारगेंच्या निमित्ताने भावखाऊ भूमिका आली असून, इन्स्पेक्टरच्या डॅशिंग अवतारासह अनेकदा गुगली टाकत त्यांनी हे पात्र उभे केले आहे. मात्र हा इन्स्पेक्टर अधिक टोकदार करणे सतीश राजवाडे यांच्यासारख्या ‘रफटफ’ नटासाठी कठीण नव्हते. मात्र, त्यांना ती संधी बहुधा नाकारली गेली असण्याची शक्यता वाटते.
श्वेता पेंडसे या गुणी अभिनेत्रीने मीराच्या भूमिकेचे अनेकविध विभ्रम मांडत आणि त्यात उत्तम रंग भरत हे पात्र लक्षवेधी केले आहे. परंतु, या पात्राला लेखनात अजून वाव मिळायला हवा होता. अभिजित केळकर याने दिव्यजीत रंगवताना, नाटकातला लेखक व मीराचा प्रियकर अशा दोन्ही बाजू नीट सांभाळल्या आहेत. सुबोध पंडे यांनी विविध नावे धारण करत रंगवलेले पात्र लक्षात राहते. रहस्यनाट्याला पूरक ठरेल असा छायाप्रकाशाचा खेळ शीतल तळपदे यांनी प्रकाशयोजनेतून मांडला आहे. अजित परब यांचे पार्श्वसंगीत या नाटकाच्या जातकुळीला साजेसे आहे. ‘बदाम राजा प्रॉडक्शन्स’ निर्मित हे नाटक म्हणजे सतत उत्कंठा वाढवत नेणारी रहस्यमय कलाकृती आहे.