Join us

पेशवाई थाटाची साधारण गोष्ट..!

By admin | Published: August 10, 2014 12:18 AM

इतिहासातले सुवर्णपान दृश्य माध्यमातून आविष्कृत करायचे म्हणजे तेवढे धाडस हवे आणि तितकाच आत्मविश्वासही हवा. मृणाल कुलकर्णीने हे शिवधनुष्य पेलण्याचा आटोकाट प्रयत्न ‘रमा माधव’मधून केला आहे

इतिहासातले सुवर्णपान दृश्य माध्यमातून आविष्कृत करायचे म्हणजे तेवढे धाडस हवे आणि तितकाच आत्मविश्वासही हवा. मृणाल कुलकर्णीने हे शिवधनुष्य पेलण्याचा आटोकाट प्रयत्न ‘रमा माधव’मधून केला आहे खरा; पण पेशवाईचा श्रीमंत बाज पकडताना चित्रपटाची गोष्ट मात्र विस्कळीत झाली आहे. केवळ या चित्रपटाचे देखणोपण आणि त्यातल्या नेत्रसुखद चित्रचौकटी तेवढय़ा मनावर ठसत जातात व इतिहासातल्या श्रीमंत पेशवाईची गोष्ट मात्र सर्वसाधारण पातळीवर राहते.
पानिपतच्या लढाईनंतर माधवरावांच्या अंगावर अचानक पेशवेपदाची वस्त्रे चढली आणि त्यानंतरच्या काळात त्यांनी धोरणीपणो राज्य चालवले. एकीकडे राज्यशकट हाकत असताना त्यांचे व रमाचे प्रेम अतूट नाते विणत होते. निस्सीम प्रेमाचे चांदणो रमा-माधवांचे आयुष्य उजळून टाकत होते. दुर्दैवाने माधवराव पेशवे अल्पायुषी ठरले व त्यांच्यासोबत रमा सती गेली. पुढे या प्रेमकहाणीने इतिहासाच्या पानांत महत्त्वाचे स्थान प्राप्त केले आणि रमा-माधव अजरामर झाले. ही सगळी कहाणी या चित्रपटात मांडली आहे.
रमा-माधव यांची ही प्रेमकहाणी असेच या चित्रपटाचे सातत्याने वर्णन केले गेले असले तरी चित्रपटात ही कहाणी दृगोच्चर होण्यासाठी उत्तरार्धार्पयत वाट पाहावी लागते. मध्यंतरार्पयत रमाचे बालपण, पेशवाईची ओळख, शनिवारवाडय़ाची भ्रमंती यात चित्रपट गुंतला आहे आणि उत्तरार्धात रमा-माधवची कथा पकड घेत आहे असे वाटत असतानाच चित्रपट भैरवी आळवण्याकडे वळतो. पेशवाईची भव्यता दाखवण्यात चित्रपटात अजिबात कसूर करण्यात आलेली नाही. पेशवेकालीन वास्तू, उंची वस्त्रलंकार यातून त्या वेळेचा थाट डोळ्यासमोर येत जातो आणि त्यातून पेशव्यांची श्रीमंती उलगडत जाते. पण चित्रपट यातच फार वेळ अडकल्यासारखा वाटतो. 
दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णीने चित्रपट भव्यदिव्य करण्याचा केलेला प्रयत्न परिपूर्ण आहे, मात्र काही प्रसंग उगाच लांबल्यासारखे वाटतात. या प्रसंगांचे फ्रेमवर्क अप्रतिम असले, तरी त्यांनी घेतलेल्या वेळेवर अंकुश हवा होता. रमाचा बालपणीचा काळ ब:यापैकी लांबला आहे आणि काळवेळेचे गणित अचूक न सुटल्याने गोष्ट सांगताना त्यात विस्कळीतपणा जाणवतो. पेशवाईतली महत्त्वाची घटना असलेली पानिपतची लढाई केवळ काही दृश्यांपुरती मर्यादित राहते आणि राक्षसभुवनच्या लढाईत पेशव्यांनी मारलेल्या बाजीचा आनंदही सीमित होतो. मुजरा व इतर गाण्यांचे अस्तित्वही अनावश्यक वाटते. 
कलावंतांची अभिनय ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. आलोक राजवाडेने माधवरावांची भूमिका सर्वसामथ्र्यानिशी पेलली असून, त्याच्या कारकिर्दीतला हा महत्त्वाचा टप्पा ठरायला हरकत नाही. छोटी रमा (श्रुती कार्लेकर) व मोठी रमा (पर्ण पेठे) यांनी आपापल्या रमा रमणीय केल्या आहेत. नानासाहेब पेशवे (रवींद्र मंकणी) व गोपिकाबाई (मृणाल कुलकर्णी) यांनी एकेकाळी रंगवलेल्या रमा-माधवच्या स्मृतींना उजाळा देत यात आधीची पिढी परिपक्वतेने साकारली आहे. 
राघोबादादा (प्रसाद ओक), आनंदीबाई (सोनाली कुलकर्णी), सदाशिवभाऊ (अमोल कोल्हे), पार्वतीबाई (श्रुती मराठे) आदी कलावंतांच्या भूमिका ठीक आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण उत्तम आहे आणि त्यामुळे नजरबंदी करण्यात मात्र चित्रपट यशस्वी ठरला आहे.