कलाकार : सई ताम्हणकर, ललित प्रभाकर, पौर्णिमा मनोहर, अस्मिता आजगावकर, ऋषी मनोहर, दिप्ती लेले, क्षितीज दाते, स्नेहा माजगावकर, सतीश आळेकर, आर्य खोत, निनाद गोरे, वृषसेन दाभोळकर, मंगेश भिडे, केतन विसाळलेखक-दिग्दर्शक : ज्ञानेश झोटींगनिर्माते : रणजीत गुगळे (ह्युज प्रोडक्शन्स)ओटीटी : सोनी लिव्हस्टार - साडे तीन स्टारपरीक्षण - संजय घावरे
आपल्यापैकी बरेचजण घरात वेगवेगळे प्राणी पाळतात. त्यांची योग्य ती काळजी घेतात. त्यांच्या आवडी-निवडी जोपासतात. मुलांप्रमाणं त्यांचा सांभाळही करतात, पण पाळीव प्राण्यांच्या पालणपोषणावर एखादी वेब सिरीज बनू शकते याचा कधी कुणी विचारही केला नसेल. दिग्दर्शक ज्ञानेश झोटींग यांनी नेमका हाच विचार केला आणि एका नावीन्यपूर्ण संकल्पनेवर आधारलेली 'पेट पुराण' वेब सिरीज सोनी लिव्हवर रिलीज झाली आहे. यातील सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर या नव्या कोऱ्या जोडीची केमिस्ट्री आणि पेट्सच्या पॅरेंटींगच्या गमतीजमती खिळवून ठेवतात.
कथानक : लग्न होऊन तीन वर्षे लोटली तरी मूल नसलेल्या अदिती-अतुल यांची ही कहाणी आहे. अतुल शेफ आहे, तर अदिती फायनान्स सेक्टरमध्ये आहे. पेरेंटींगची जबाबदारी घ्यायची नसल्यानं कुटुंबियांनी सांगूनही दोघं मुलांसाठी चान्स घ्यायला तयार नसतात. अतुलच्या आत्येभावाला एकदा बाहेर जायचं असल्यानं तो गोदाक्काला म्हणजेच आपल्या मांजरीला अतुल-अदितीच्या स्वाधीन करतो. गोदाक्काला सांभाळता-सांभाळता दोघेही तिच्या प्रेमात पडतात आणि आपणही एखादं पेट पाळावं या निर्णयावर पोहोचतात. मांजर की कुत्रा यावर घोडं अडतं, पण कुत्रा आणण्याचं पक्कं होतं. त्यासाठी पेट मार्केटमध्येही जातात, पण तिथली अस्वच्छता पाहून अदिती त्या विरोधात तक्रार करते. त्यानंतर पेट विकत न घेता दत्तक घेण्याच्या निर्णयावर दोघेही ठाम होतात. त्यानंतर जे घडतं ते पाहताना खूप धमाल येते.
लेखन-दिग्दर्शन : एका सुरेख प्लॅाटवर तितकंच छान लेखन आणि त्याच तोलामोलाचं दिग्दर्शन करण्यात आल्यानं प्रत्येक सेकंदागणिक काहीतरी वेगळं पहात असल्याची अनुभूती येते. एका खूप वेगळ्या विषयावर आधारलेली ही वेब सिरीज ज्ञानेश यांनी अतिशय गंमतीशीर पद्धतीनं सादर केली आहे. वेगवेगळ्या प्रकरणांद्वारे प्रत्येक भाग उलगडत जातो आणि कथानक पुढे सरकतं. दैनंदिन जीवनातील संभाषण आणि प्रसंगांद्वारे अतिशय बेमालूमपणे विनोदनिर्मिती करण्यात आली आहे. पाळीव प्राणी या विषयाची सांगड मानवी स्वभावाशी घालताना प्रत्येक घरातील उदाहरण सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. लहान-सहान प्रसांगांमधून आपोआप होणारी विनोदनिर्मिती सहज ओठांवर स्माईल खुलवते. यातील संवाद रोजच्या जीवनातील असले तरी बरंच काही सांगणारे आणि गंमतीशीर आहेत. पार्श्वसंगीत, कॅमेरावर्क, एडिटींगही चांगलं झालं आहे.
कलाकारांचा अभिनय : या वेब सिरीजच्या माध्यमातून सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर हे प्रथमच एकत्र आले आहेत. खरं तर त्यांनी पहिल्यांदा एकत्र काम केलेला चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. या वेब सिरीजचं शूटिंग त्यांनी सर्वात शेवटी केलं, जे अगोदर रसिकांसमोर आलं आहे. अदितीची भूमिका सईनं खूप चांगल्याप्रकारे सादर केली आहे. एक वेगळीच सई यात दिसते. आपण खूप चांगले नट असल्याचं ललितनं यापूर्वीच सिद्ध केलं आहे. यात त्यानं साकारलेला आदित्य आजच्या काळातील असून, त्यानं तो अत्यंत बारकाव्यांनिशी सादर केला आहे. पौर्णिमा मनोहर, अस्मिता आजगावकर, ऋषी मनोहर, दिप्ती लेले, क्षितीज दाते, स्नेहा माजगावकर, सतीश आळेकर यांचीही कामं चांगली झाली आहेत.
सकारात्मक बाजू : आजच्या काळातील वातावरण निर्मितीसह एका महत्त्वाच्या मुद्द्यावर फोकस करण्यात आला आहे.नकारात्मक बाजू : शीर्षक पेट पुराण असल्यानं प्राणी पाळण्याची आवड नसणारे कदाचित यापासून दूर राहू शकतात.
थोडक्यात : हि वेब सिरीज प्राणी पाळायला आवडणाऱ्या आणि न आवडणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या रसिकांचं मनोरंजन करणारी आहे. हलक्या-फुलक्या विनोदांसह निखळ मनोरंजनाचा आनंद उपभोगण्यासाठी 'पेट पुराण' पहायला हवी.