सैफ अली खान व अमृता सिंग यांची लेक सारा अली खान हिच्या पहिल्या-वहिल्या चित्रपटाच्या मार्गातील अडचणी थांबता थांबेनात. होय, साराचा ‘केदारनाथ’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. पण ऐन रिलीजच्या तोंडावर या चित्रपटाला होणारा विरोध तीव्र होतो आहे. होय, अगदी टीजर रिलीज होताच, या चित्रपटाने वाद ओढवून घेतला होता. टीजर पाहिल्यानंतर उत्तराखंडातील केदारनाथ मंदिरातील पुजा-यांनी या चित्रपटावर तीव्र प्रतिक्रिया देत, या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. ‘केदारनाथ’ हा चित्रपट हिंदुंच्या भावना दुखावणारा आहे,असा दावा या पुजा-यांनी केला होता. यानंतर भाजपाचे नेते अजेंद्र अजय यांनीही ट्विट करत या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली होती. एक हिंदू मुलगा एका एक मुस्लिम मुलीला आपल्या पाठीवर वाहून नेताना यात दाखवले आहे. हे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे आहे. कारण केदारनाथमध्ये कधीही मुस्लिम व्यक्तिला कुणी पाठीवर वाहून नेणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. आता या चित्रपटाविरोधात आंतरराष्ट्रीय हिंदू सेना या संघटनेने याचिका दाखल केली आहे. गुजरात हायकोर्टात ही याचिका दाखल केली असून पुढच्या आठवड्यात त्यावर सुनावणीची शक्यता आहे.
‘केदारनाथ’ या चित्रपटातून सैफ अली खानची मुलगी सारा अली खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. या चित्रपटात ती सुशांत सिंग राजपूतसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.