माझिया प्रियाला प्रीत कळेना या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री मृणाल दुसानीस ही सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे, कुटुंबियांचे फोटो पोस्ट करत असते. तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एक फोटोने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मृणालने नुकताच एक हटके अंदाजातील तिचा फोटो पोस्ट केला आहे.
मृणालने शेअर केलेल्या या फोटात तिने डोक्यावर हुडी घेतली असून तिचा हा हटके अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. तसेच या फोटोसोबत तिने दिलेले कॅप्शन देखील चर्चेचा विषय ठरत आहे. तिने या फोटोसोबत असंच... येवढेच कॅप्शन लिहिले आहे. या फोटोत मृणाल खूपच वेगळी दिसत आहे. मृणालचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या फोटोला काहीच तासांत प्रचंड लाईक्स मिळाले आहेत.
मृणाल गेल्या काही दिवसांपूर्वी चांगलीच चर्चेत आली होती. तिने काहीच दिवसांपूर्वी तिचा मेकओव्हर केला असून तिचा मेकओव्हरनंतरचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. आपल्याला या फोटोत छोट्या केसांमधील मृणाल पाहायला मिळाली होती. या फोटोत तिला ओळखणे देखील कठीण जात होते. पण ती या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत असल्याचे तिच्या चाहत्यांनी तिला कमेंटच्या माध्यमातून सांगितले होते. मृणालने लूक बदलल्यानंतर सामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रेटींनीदेखील तिच्या या लूकचे कौतुक केले होते. अभिनेत्री ऋतुजा बागवे, शर्मिष्ठा राऊत यांना तिचा हा लूक खूप आवडला असल्याचे त्यांनी तिला सांगितले होते.
मराठी इंडस्ट्रीत सरळ, साधी आणि सोज्जवळ अभिनेत्री अशी मृणालची ओळख निर्माण झाली आहे. तिने तू तिथे मी, अस्सं सासर सुरेख बाई या मालिका आणि नाटकांमध्येही काम केलं आहे. सुखांच्या सरीने हे मन बावरे या मालिकेमध्येही आपल्या भूमिकेने मृणालने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला. मृणाल केवळ चांगली अभिनेत्रीच नव्हे तर उत्तम डान्सरही आहे. तिने एकापेक्षा एक अप्सरा आली या शोमधून रसिकांची मनं जिंकली आहेत.
25 फेब्रुवारी 2016 रोजी मृणाल अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजीनिअर असलेल्या नीरज मोरेसह अरेंज मॅरेज पद्धतीने लग्नबंधनात अडकली. कांदेपोहेच्या कार्यक्रमात मृणाल आणि नीरज पहिल्यांदा एकमेकांना भेटले. नीरज अमेरिकेतच राहात असून मृणाल काही महिने भारतात तर काही महिने अमेरिकेत राहाते.