जाहिरातीच्या ऑडिशनसाठी गेलेल्या आदिनाथला 'असा' मिळाला बॉलिवूड सिनेमा, अभिनेत्याने शेअर केला ‘83’ चा किस्सा By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 7:11 PM1 / 7मराठी चित्रपटसृष्टीतील लाडका अभिनेता म्हणजे आदिनाथ कोठारे. ‘छकुला’ चित्रपटातून त्याने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत आदिनाथनेही कलाविश्वाची वाट धरली. ‘चंद्रमुखी’, ‘झपाटलेला २’ यांसारख्या चित्रपटातून त्याने चाहत्यांची मनं जिंकली. मराठी सिनेसृष्टीत नाव कमावल्यानंतर आदिनाथने बॉलिवूडलाही आपलंसं केलं. 2 / 7२०२१ साली प्रदर्शित झालेल्या ‘83’ या चित्रपटात आदिनाथ महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात त्याने दिलीप वेंगसरकर या क्रिकेटपटूची भूमिका साकारली होती. या चित्रपटात आदिनाथने रणवीर सिंहबरोबर स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं कौतुकही झालं होतं. 3 / 7आदिनाथने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘83’ सिनेमाचा किस्सा सांगितला. खरं तर एका जाहिरातीच्या ऑडिशनसाठी गेलेल्या आदिनाथला ‘83’ चित्रपटासाठी विचारण्यात आलं होतं. ‘83’ सिनेमाचा किस्सा सांगताना आदिनाथ म्हणाला, “ऑडिशन देणं, रिजेक्ट होणं हा कलाकाराच्या आयुष्याचा भाग असतो. मुकेश छाब्राकडून मला एकेदिवशी जाहिरातीसाठी कॉल आला होता.”4 / 7“मी तेव्हा पाणी चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करून आलो होतो. त्यामुळे माझ्या लूकमध्ये बदल झाला होता. माझं वजन कमी झालं होतं. मिशी होती, केस बारीक केलेले, चेहराही काळवंडला होता. माझा लूक जाहिरातीसाठी जात नव्हता. त्यामुळे मी रिजेक्ट झालो. मी निघालेलो तेवढ्यात त्याने मला थांबवलं. तू एका भूमिकेसाठी जाऊ शकतोस, असं तो मला म्हणाला.”5 / 7पुढे त्याने सांगितलं, “त्याने मला एक व्हिडिओ दाखवला. ती दिलीप वेंगसकरांची मुलाखत होती. मी त्याला कोणता प्रोजेक्ट आहे असं विचारलं. त्याने मला ‘83’ असं सांगितलं. मला काहीच कल्पना नव्हती. मग त्याने मला वर्ल्डकप जिंकलेला त्यावर चित्रपट आहे, असं सांगितलं. मी त्याला कोण चित्रपट करतंय असं विचारल्यावर त्याने कबीर खानचं नाव घेतलं.”6 / 7“रणवीर सिंह कपिल देवची भूमिका साकारणार आहे, हेदेखील त्याने सांगितलं. मी ऑडिशन दिली. घरी गेल्यावर मला फोन आला आणि माझी निवड झाल्याचं मला सांगण्यात आलं. दुसऱ्या दिवशी कबीर खानबरोबर मीटिंग झाली. त्यानंतर मला हा सिनेमा किती मोठा आहे, याची जाणीव झाली, ” असंही तो म्हणाला. 7 / 7‘83’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच सिटी ऑफ ड्रीम्समधील भूमिकेसाठी विचारणा झाल्याचंही आदिनाथने या मुलाखतीत सांगतिलं. आदिनाथ सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. आता तो बजाओ या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications