KL Rahul-Athiya Shetty Wedding :अथिया राहुलचं आज शुभमंगल ! दाक्षिणात्य पद्धतीनुसार केळीच्या पानावर जेवण, आणि बरंच काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 12:00 PM2023-01-23T12:00:50+5:302023-01-23T12:08:38+5:30

बिग फॅट वेडिंगला झाली सुरुवात. लेकीच्या लग्नासाठी अण्णा सुनील शेट्टीने केली पारंपारिक दाक्षिणात्य पद्धतीने तयारी.

बॉलिवुड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल लग्नबंधनात अडकत आहेत. सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्महाऊसवर हा विवाहसोहळा पार पडतोय.

गेल्या दोन वर्षांच्या अफेअरनंतर हे कपल लग्नबंधनात अडकत आहे. सुनील शेट्टीने लेकीच्या लग्नात काहीच कमी पडू दिलेलं नाही. काल खंडाळ्याच्या फार्म हाऊसवर संगीत नाईट चे जोरदार आयोजन करण्यात आले.

आज संध्याकाळी अथिया आणि राहुल सात फेरे घेतील तर संध्याकाळी साडेसहा वाजता दोघेही कुटुंबासोबत माध्यमांसमोर येणार आहेत. या सोहळ्याला अनेक बॉलिवुड कलाकार येणार असल्याची चर्चा आहे. त्यात काल संगीत नाईट मध्ये अर्जुन कपूर बहिण अंशुला कपूरसोबत आल्याचे दिसले.

या बिग फॅट वेडिंगसाठी नवरीचा लुक कसा असणार यावरही चर्चा होत आहे. तर अथिया सेलिब्रिटी डिझायनर सब्यसाची यांच्या लेहेंग्यात एंट्री घेणार आहे. दोघांचा व्हाईट आणि गोल्डन रंगाचे कॉम्बिनेशन असलेला आऊटफिट असणार आहे.

लग्नात सुमारे १०० पाहुणे असतील अशी चर्चा आहे. पाहुण्यांना प्लेट मध्ये नाही तर पारंपारिक दाक्षिणात्य स्टाईलमध्ये केळ्याच्या पानावर जेवण वाढलं जाणार आहे.

लग्नात कोण कोण पाहुणे असतील हे अजुनही स्पष्ट झालेले नाही. मात्र पाहुण्याच्या यादीत सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार, अनुष्का शर्मा, विराट कोहली, एम एस धोनी यांसोबतच आणखी काही सेलिब्रिटी आणि क्रिकेटर्सचा समावेश आहे. मात्र प्रत्यक्ष लग्नात कोण हजेरी लावणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

आज लग्नसोहळा पार पडल्यानंतर पुढील काही दिवसात ग्रॅंड रिसेप्शन देण्यात येणार आहे. यासाठी अनेक बॉलिवुड कलाकार आणि दिग्गज क्रिकेटपटूंची हजेरी असेल. रिसेप्शनसाठी सुमारे ३ हजार पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे.

२०२१ मध्ये 'तडप' चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान अथिया आणि केएल राहुलचे नाते अधिकृत झाले. अथियाने तिच्या भावाच्या डेब्यू चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये केएल राहुलसोबत एन्ट्री घेतली. यादरम्यान सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या.

अथिया शेट्टी आणि केएल राहुल सोशल मीडियावर एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. आता दोघांनाही लग्नबंधनात अडकताना बघून चाहतेही खूश आहेत.