IN PICS : जेव्हा बाजूलाच बसलेल्या जेआरडी टाटांना ओळखू शकले नाही दिलीप कुमार…

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 04:18 PM2020-12-11T16:18:27+5:302020-12-11T16:35:07+5:30

एक रंजक किस्सा

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक रंजक किस्सा आम्ही आज सांगणार आहोत.

दिलीप कुमार यांनी आपल्या सहा दशकांच्या करिअरमध्ये केवळ 63 सिनेमे केलेत. पण या सिनेमात त्यांनी अभिनयाची वेगळी परिभाषा रचली.

त्याकाळात दिलीप कुमार यांचा रूबाब काही और होता. लोक त्यांची एक झलक पाहण्यासाठी वेडे व्हायचे. दिलीप कुमार यांनाही त्यांच्या ‘दिलीप कुमार’ असण्याचा अभिमान होता. याच काळातील हा किस्सा, थेट जेआरडी टाटांशी जुळलेला.

तर एकदा दिलीप कुमार विमान प्रवास करत होते. दिलीप कुमार विमानात आहेत म्हटल्यावर साहजिकच विमानातील अन्य प्रवाशांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.

त्यांचा आॅटोग्राफ घ्यायला, त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी विमानातील प्रवाशांत जणू स्पर्धा लागली होती. विमानात दिलीप कुमार यांच्या शेजारच्या सीटवर बसलेली एक व्यक्ति मात्र शांतपणे बसून खिडकीतून बाहेर बघत होती.

त्या व्यक्तिला बघून दिलीप कुमार यांना राहावले नाही. विमानातील प्रत्येक व्यक्ती आपल्याशी बोलायला, आॅटोग्राफ घ्यायला येत असताना ही बाजूला बसलेली व्यक्ति इतकी शांत कशी? असा प्रश्न त्यांना पडला होता.

अखेर न राहवून तुम्ही सिनेमे पाहत नाही का? असा प्रश्न दिलीप कुमार यांनी त्या व्यक्तिला केला.

यावर, बघतो पण खूप क्चचित, असे उत्तर त्या व्यक्तिने दिले. समोरच्या व्यक्तिचे ते उत्तर ऐकून दिलीप कुमारांना स्वत:ची ओळख करून देण्याचा मोह झाला. मी दिलीप कुमार, असे त्यांनी सांगितले.

यावर ती व्यक्ति किंचित हसली आणि खूप छान, सिनेमात नेमकं काय करता तुम्ही? असा प्रश्न केला. यावर मी एक अभिनेता आहे, असे उत्तर दिलीप कुमार यांनी दिले.

यानंतर त्या व्यक्तिनेही आपली ओळख करून दिली. माझे नाव जेआरडी टाटा आहे, असे ती व्यक्ति म्हणाले. जेआरडी टाटा हे नाव ऐकून दिलीप कुमार उडालेच. काहीसे खजिलही झालेत. आपल्या आत्मचरित्रात दिलीप कुमार यांनी हा किस्सा लिहिला आहे.