गीता कपूर यांच्या पार्थिवाला अजूनही मुलांची प्रतीक्षा; निष्ठुर मुलांच्या काळजाला फुटेना पाझर!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2018 9:22 AM
जिवंतपणी अतोनात छळ केलाच शिवाय मृत्यूनंतरही दगडाचे काळीज असलेल्या मुलांना पाझर फुटत नसल्याने अभिनेत्री गीता कपूूर यांचे पार्थिव बेवारस ...
जिवंतपणी अतोनात छळ केलाच शिवाय मृत्यूनंतरही दगडाचे काळीज असलेल्या मुलांना पाझर फुटत नसल्याने अभिनेत्री गीता कपूूर यांचे पार्थिव बेवारस स्थितीत रुग्णालयात पडून आहे. ‘पाकिजा’ फेम अभिनेत्री गीता कपूर यांनी वयाच्या ५७व्या वर्षी वृद्धाश्रमताच अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर कोण अंत्यसंस्कार करणार? असा प्रश्न अजूनही कायम असून, निष्ठुर मुलांनी आपल्या जन्मदात्रीच्या पार्थिवाकडेही वळून बघणे योग्य समजले नाही. दरम्यान, सेंट्रल बोर्ड आॅफ फिल्म सर्टिफिकेशनचे सदस्य अशोक पंडित यांनी त्यांच्या अंत्यसंस्काराचा खर्च पेलण्याचा निर्णय घेतला आहे. अंत्यसंस्काराचा विधी पूर्ण करण्यासाठी ते त्यांच्या काही मित्रांना बोलाविणार आहेत. तत्पूर्वी शनिवारपासून ते आणि सीबीएफसीचे इतर मेंबर्स गीता यांचा मुलगा आणि मुलीची प्रतीक्षा करीत असून, ती निष्ठुर मुले अजूनही पार्थिवाचा ताबा घेण्यासाठी पुढे आले नाहीत. अशोक पंडित यांनी शनिवार आणि रविवार त्यांच्या मुलांची प्रतीक्षा करण्याचे ठरविले आहे. रविवारी सायंकाळपर्यंत त्यांच्या मुलांनी किंवा नातेवाइकांनी त्यांच्या पार्थिवाचा ताबा न घेतल्यास सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे स्पष्ट केले. अशोक पंडित यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, गीता यांचा मृत्यू नैसर्गिक आहे. एसआरव्ही हॉस्पिटलचे डॉक्टर त्रिपाठी यांनी यास दुजोरा दिला आहे. अशोक यांच्या मते, अखेरच्या श्वासापर्यंत गीता यांच्या मुखी मुलगा राजाचेच नाव होते. ‘माझा राजा येणार’ असे त्या वारंवार म्हणत होत्या. अशोक यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी मी गीता यांची भेट घेतली. त्यावेळी त्या केवळ मुलगा राजाचा धावा करीत होत्या. त्या जास्त बोलू शकत नव्हत्या. कारण एक महिन्यांपासूनच त्यांनी अन्न सोडले होते. मात्र अशातही त्या मुलाचे नाव वारंवार घेत होत्या. गेल्यावर्षी त्यांना वृद्धाश्रमात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, २१ एप्रिल २०१७ रोजी गीता यांना रक्तदाब कमी झाल्यामुळे मुलगा राजा याने गोरेगाव स्थित एसआरव्ही रुग्णालयात फरशीवर बेवारस सोडून दिले होते. पेशाने कोरिओग्राफर असलेला राजा महिना उलटूनही त्यांना एकदाही बघण्यासाठी आला नव्हता. त्यानंतर गीता यांनी त्यांचे दु:ख सांगताना मुलगा रोज मला मारहाण करीत असल्याचे म्हटले होते. तसेच चार-चार दिवस जेवण देत नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यांची ही करूण कथा ऐकून त्यावेळी अशोक पंडित आणि निर्माता रमेश तौरानी यांनी त्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च पेलला होता. तसेच त्यांना वृद्धाश्रमात दाखलही केले होते. अखेरपर्यंत रमेश तौरानी आणि अशोक पंडित यांनी त्यांना आधार दिला. अजूनही हे दोघेच त्यांची जबाबदारी स्वीकारून आहेत. सोशल मीडियावर संतापदिवंगत अभिनेत्री गीता कपूर यांचा मुलगा राजा हा बॉलिवूडमध्ये कोरिओग्राफर आहे. तर त्यांची मुलगी पूजा एअर होस्टस आहे. या दोघांनीही आपल्या जन्मदात्रीकडे मरेपर्यंत बघणे योग्य समजले नाही. सध्या या दोघांबद्दल सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात असून, अशी ‘औलाद असण्यापेक्षा निपुत्रिक बरे’ अशा शब्दात यूजर्स आपला संताप व्यक्त करीत आहेत. अनेकांनी तर अशा निष्ठुर मुलांवर जरब बसविण्यासाठी कायदाच करण्याची गरज असल्याचे म्हटले. तर काहींनी बॉलिवूडकरांनीच यांच्या हाताला काम देऊ नये, अशी मागणी लावून धरली.