मृत्यूपूर्वी चाहतीने संजय दत्तच्या नावे केली ७२ कोटींची संपत्ती; तरी अपूर्ण राहिली तिची शेवटची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 12:58 PM2023-05-24T12:58:49+5:302023-05-24T13:05:42+5:30

Sanjay dutt: या चाहतीने तिच्या घरातील अन्य कोणत्याही व्यक्तीच्या नावे एक रुपयाही ठेवला नाही.

कलाविश्वात असे काही ठराविक सेलिब्रिटी आहेत ज्यांचा चाहतावर्ग अफाट आहे. त्यामुळे काही चाहते तर असे आहेत जे आपल्या लाडक्या कलाकारासाठी काहीही करायला तयार होतात. सध्या असाच एक किस्सा अभिनेता संजय दत्त याच्या चाहतीसोबत घडला आहे.

संजय दत्तच्या एका चाहतीने तिची तब्बल ७२ कोटींची संपत्ती संजय दत्तच्या नावे केल्याचं समोर आलं आहे.

संजय दत्तची एक मराठमोळी चाहती होती तिचं २०१८मध्ये निधन झालं. मात्र, तिच्या निधनानंतर वाचण्यात आलेल्या मृत्यूपत्रात तिने सगळी संपत्ती संजयच्या नावे केल्याचं दिसून आलं.

विशेष म्हणजे या चाहतीने तिच्या घरातील अन्य कोणत्याही व्यक्तीच्या नावे एक रुपयाही ठेवला नाही. त्यामुळे मृत्यूनंतरही या चाहतीची चर्चा नेटकऱ्यांमध्ये होतीये.

मुंबईतील मलबार हिल परिसरात राहणारा निशा पाटील असं संजयच्या चाहतीचं नाव होतं. निशा यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी संपूर्ण संपत्ती, त्यांचा बँक बॅलेन्स संजयच्या नावे केला.

निशा यांचा मृत्यू झाल्यानंतर संजय दत्तला पोलिसांचा फोन आला. आणि, निशा पाटील यांनी त्यांची संपत्ती तुमच्या नावे केल्याचं सांगितलं. संजय दत्तसाठी निशा पाटील पूर्णपणे अनोळखी होत्या. मात्र, त्यांचं प्रेम पाहून तो खूप भारावून गेला.

निशा यांनी संजयच्या नावे संपत्ती तर केली. मात्र, संजयला या संपत्तीचं ओझ वाटत होतं. त्यामुळे त्याने तातडीने बँक ऑफ बडोदोच्या वाळकेश्वर शाखेशी इमेल द्वारे संपर्क साधला.

बँकेशी संपर्क झाल्यानंतर त्याने निशा यांची संपत्ती त्यांच्या जवळच्या कुटुंबीयांकडे तातडीने हस्तांतरित करण्याची विनंती केली. त्यामुळे निशा यांची इच्छा असतानाही त्यांची संपत्ती संजयच्या नावे झाली नाही.

गेली कित्येक वर्ष संजय आपल्या उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

आजवरच्या कारकिर्दीत संजयने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

एक काळ असा होता जेव्हा संजयची तुफान क्रेझ होती. अनेक तरुण त्याची स्टाइल कॉपी करत होते.