"बायका ट्रकभरुन 'माहेरची साडी' बघायला यायच्या", अजिंक्य देव म्हणाले, "या चित्रपटाने खोऱ्याने पैसे..." By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 3:29 PM1 / 9१९९१ साली प्रदर्शित झालेला 'माहेरची साडी' हा चित्रपट लोकप्रिय मराठी चित्रपटांपैकी एक आहे. अलका कुबल, रमेश भाटकर, अजिंक्य देव, उषा नाडकर्णी, विक्रम गोखले, आशलता वाबगावकर अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाने महाराष्ट्रातील महिलांना अक्षरश: वेड लावलं होतं. 2 / 9'माहेरची साडी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी केली होती.९०च्या दशकात या चित्रपटाने तब्बल १०० पेक्षा जास्त आठवडे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला होता. माहेरच्या साडीने सिनेसृष्टीत अक्षरश: धुमाकूळ घातला होता. 3 / 9या चित्रपटामुळे अजिंक्य देव यांच्या लोकप्रियतेत भर पडली होती. या चित्रपटात त्यांनी लक्ष्मीच्या भावाची म्हणजेच विकी ही भूमिका साकारली होती. अजिंक्य देव यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत माहरेची साडी चित्रपटाची आठवण सांगितली. 4 / 9ते म्हणाले, ''माहेरची साडी'साठी विजय कोंडके यांनी मला त्यांच्या दादरच्या ऑफिसमध्ये बोलवलं होतं. त्यांनी मला कथा ऐकवली. जवळपास पाऊणे दोन तास ते मला कथा ऐकवत होते. कोणत्या सीनला बायका रडणार, कुठे टाळ्या वाजणार हे सगळंही त्यांनी मला तेव्हाच सांगितलं होतं. अशी गोष्ट मी याआधी कुणाकडूनच ऐकली नव्हती.'5 / 9''माहेरची साडी' हा चित्रपट एका राजस्थानी चित्रपटाचा रिमेक होता. तेव्हाही रिमेक व्हायचे. पण, एवढे चालत नव्हते. राजस्थानी चित्रपट चालला, पण माहेरची साडीने इतिहास घडवला. तेव्हा विजय कोंडके हे दादांचे चित्रपट महाराष्ट्रात वितरित करायचे. ते सगळीकडे फिरले होते. त्यांना प्रेक्षकांची नस माहीत होती. त्यामुळे चित्रपट पाहताना कुठे बायका ओक्षाबोक्षी रडणार, हे त्यांना आधीच माहीत होतं.'6 / 9'पण, माझ्यादृष्टीने हे हास्यास्पद होतं. कारण, चित्रपट प्रदर्शित होण्याआधी हे आपण ठरवू शकत नाही. चित्रपटाच्या शूटिंगवेळीही मी व्यग्र होतो. नेसली माहेरची साडी या गाण्यात सहा कडवी होती. मला आणि विक्रम गोखलेंना दुसरीकडे शूटिंगला जायचं होतं. म्हणून आम्ही विजय कोंडकेंशी बोलून त्यातील दोन कडवी काढून टाकायला लावली होती. चित्रपट प्रदर्शित झाला आणि हे गाणं सुपरहिट झालं.'7 / 9'माहेरची साडी' चित्रपटाची बॉम्बे लॅबमध्ये ट्रायल झाली होती. मी आणि माझी बायको गेलो होतो. मला दुसरीकडे शूटिंगला जायचं होतं. म्हणून मी चित्रपट पाहिल्यानंतर थोडं लवकर निघालो. पण, चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या नावावर अजून एक फ्लॉप पडणार असं मी म्हणालो होतो.'8 / 9'प्रिमियरला मी जाऊ शकलो नव्हतो. तेव्हा मी उटीला शूट करत होतो. मला फोन आला चित्रपट सुपरहिट झालाय. आजही माहरेची साडी चित्रपट पाहिल्यानंतर बायका तेवढ्याच रडतात, असं मी ऐकलं आहे. पण, या चित्रपटाचे दोन आठवडे राऊंड क्लॉक म्हणजे १२-३-६-९ असे शो लागले होते. मला वाटतं, असा हा पहिलाच चित्रपट असेल. ट्रकभरुन बायका चित्रपट पाहायला यायच्या.'9 / 9'विजय कोंडकेंना या चित्रपटाने पहिल्या खोऱ्याने पैसे दिले. पण, त्यांना याची पहिल्या दिवसापासून कल्पना होती. माहेरची साडी चित्रपट चालेल असं मला कधीच वाटलं नव्हतं,' असंही ते म्हणाले. आणखी वाचा Subscribe to Notifications