Join us

जास्त मद्यसेवनाने झाला होता मीना कुमारी यांचा मृत्यू, एकटेपणामुळे दारूला केलं होतं जवळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 6:23 PM

1 / 7
आपल्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारी आजही त्यांच्या एकापेक्षा एक भूमिकांसाठी ओळखल्या जातात. तेव्हाच्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये त्यांचं नाव घेतलं जात होतं. त्यांच्या कामासोबतच त्यांची पर्सनल लाइफही नेहमी चर्चेत राहत होती. १ ऑगस्ट १९३३ मध्ये त्यांचा जन्म मुंबईत झाला होता तर ३१ मार्च १९७२ मध्ये त्यांचं निधन झालं होतं. त्यांच्या सौंदर्या इतकंच त्यांचं नशीब असतं तर वेगळं चित्र असतं. बालवयातच त्यांनी सिनेमात काम करायला सुरूवात केली होती.
2 / 7
मीना कुमारी बालपणीच आई-वडील आणि भाऊ-बहिणींसाठी सिनेमातून पैसे कमावू लागल्या होत्या. नंतर ही त्यांची आवड बनली. मीना कुमारी यांनी शालेय शिक्षण घेतलं नव्हतं. पण त्यांना काही भाषांचं ज्ञान होतं. त्यांना शायरीची फार आवड होती. मीना कुमारी पहिल्यांदा १९३९ मध्ये दिग्दर्शक विजय भट्ट यांच्या 'लेदरफेस' सिनेमात दिसल्या होत्या. त्यानंतर १९५२ मध्ये आलेल्या 'बैजू बावरा' सिनेमाने त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवलं. हा सिनेमा इतका चालला की, १०० आठवडे थिएटरमध्ये सुरू होता.
3 / 7
कमाल अमरोही आणि मीना कुमारी यांची लव्हस्टोरीही फारच इंटरेस्टींग होती. काही भेटींमध्येच कमाल हे मीना कुमारी यांच्या प्रेमात पडले होते. मीना यांच्यासोबत त्यांना लग्न करायचं होतं. पण ते आधीच विवाहित असल्याने कमाल यांनी मीना कुमारींसोबत लपून निकाह केला. त्या न सांगता कमाल यांच्या घरी पोहोचल्या होत्या आणि तिथे राहू लागल्या होत्या. पण काही वर्षात दोघांमध्ये खटके उडू लागले होते.
4 / 7
असं सांगितलं जातं की, कमाल अमरोही मीना कुमारींबाबत फार पझेसिव्ह होते. मीना कुमारी यांच्या मेकअप रूममध्ये कोणत्याही पुरूषांच्या एन्ट्रीवर बंदी होती. त्यांनी एक व्यक्ती मीना कुमारींसोबत ठेवला होता. एक दिवस दोघांमध्ये भांडण झालं आणि कमान यांनी मीना यांना तलाक दिला. मीना कमाल यांचं घर सोडून गेल्या. नंतर मीना कुमारी यांचं नाव धर्मेंद्र सोबत जोडलं जाऊ लागलं होतं.
5 / 7
कमाल अमरोही आणि मीना कुमारी भलेही पती-पत्नी म्हणून वेगळे झाले होते. पण अभिनेत्री त्या नेहमीच कमाल यांच्या सिनेमात काम करण्यासाठी तयार होत्या. मीना यांचं आय़ुष्य फारच वेदनादायी होतं. ज्यामुळे त्यांना ट्रॅजेडी क्वीन म्हटलं जात होतं. 'पाकीजा' रिलीज झाल्यानंतर तीन आठवड्यांनी मीना कुमारी गंभीरपणे आजारी पडल्या होत्या. त्या आयुष्यात इतक्या एकट्या झाल्या होत्या की, त्यांनी दारूचा आधार घेऊ लागल्या होत्या. हळूहळू त्यांनी दारूची सवय लागली.
6 / 7
प्रमाणापेक्षा जास्त मद्यसेवन केल्याने त्यांना लिव्हर सिरोसिस आजार झाला. असं म्हणतात की, अखेरच्या दिवसातही त्या औषधांऐवजी मद्यसेवन करत होत्या. जेव्हा मीना कुमारी खूप जास्त आजारी होत्या तेव्हा शेवटपर्यंत जे फिल्मी मित्र त्यांना भेटायला जात होते त्यात धर्मेंद्र एक होते. शेवटी ३१ मार्च १९७२ मध्ये त्यांचं निधन झालं.
7 / 7
मीना कुमारी या फार सुंदर आणि तेवढ्याच लोकप्रिय होत्या. त्या प्रत्येकांना हव्याहव्याशा होत्या. त्या त्यांच्या काळात सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्री होत्या. त्यांनी हिंदी सिनेमात आपल्या काळात यशाचा एक इतिहास रचला होता. पण खऱ्या आयुष्यात त्या आधारासाठी झुरत राहिल्या. अखेर एकटेपणामुळे आणि दारूच्या सेवनामुळे त्यांचं निधन झालं.
टॅग्स :मीना कुमारीबॉलिवूडइंटरेस्टींग फॅक्ट्स