महेश मांजरेकर /लोकमत एक्सक्लुझिव्हअभिनेत्री रिमा लागूची अकाली एक्झिट चित्रपटजगताला आणि नाट्यसृष्टीला धक्का देणारी ठरली. तिच्या चाहत्यांसाठी चटका लावून गेली. वयाच्या साठीच्या उंबरठ्यावर या जगाचा निरोप घेतलेल्या रिमाविषयी अभिनेता-दिग्दर्शक आणि निर्माता महेश मांजरेकरने व्यक्त केलेलं हृद्य मनोगत...खास लोकमतसाठी...रिमा लागू गेली. तिचं जाणं हे केवळ एका रंगकर्मीच्या अकाली एक्झिटपुरतं मर्यादित नाही. माझ्या कुटुंबातली एक व्यक्ती गमावल्याचं दु:ख आज मला झालं. नाटक-सिनेमातली माझी कारकीर्द आणि रिमाचं त्या भोवती असणं हा अतूट संबंध होता. तिच्या अकाली जाण्यानं तो धागा निखळला आहे. रिमाच्या या एक्झिटनंतर तिच्या योग्यतेचं, तिच्या माणूस म्हणून असलेल्या मोठेपणाचं मूल्यमापन होईल. त्यातून एक ठसठशीत निष्कर्ष निघणार आहे. ते वास्तव असं, की रिमाला तिच्या योग्यतेचं सिंहासन मिळालंच नाही ! ( ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू काळाच्या पडद्याआड )
माझ्या व्यावसायिक आयुष्याशी तिचा अतूट संबंध होता. मला कामाची आॅफर देणारी पहिली व्यक्ती तीच होती. १९८०च्या दशकाचा उत्तरार्ध हा आजच्यापेक्षा सर्वार्थाने वेगळा काळ होता. त्यावेळची नाटकं ही यंगस्टर्ससाठी नसायची. डॉ. लागूंसारखे दिग्गज नट डोळ्यांपुढे ठेवून त्यांच्यासाठी नाटकं लिहिली वा बसवली जायची. वाहिन्यांचं जाळंही नव्हतं. थोडक्यात सांगायचं तर रंगकर्मी उदंड आणि संधी मर्यादित असं व्यस्त गणित होतं. त्या काळात १९८७ साली मी ‘अफलातून’ हे नाटक केलं. यश किंवा स्थिरावण्याशी त्याचा काही संबंध नव्हता. पण त्याच सुमारास राजन ताम्हाणे मला येऊन भेटला. एका सीरियलमध्ये काम करशील का, अशी विचारणाही त्यानं केली. फक्त रिमानं माझ्या निवडीला होकार देण्याची गरज होती. कारण ती सीरियल राजन आणि रिमा मिळून दिग्दर्शित करणार होते. राजन मला त्यासाठी तिच्या घरी घेऊन गेला. तिनं हो म्हटलं आणि माझ्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. ते रिमा आणि माझं पहिलं एन्काऊंटर...पण ते स्वप्न वास्तवात आलं नाही. कारण पुढं त्या मालिकेचं दिग्दर्शन रिमा आणि राजननं केलं नाही. ते डॉ. सतीश राजमाचीकरांकडे गेलं आणि माझाही त्या सीरिअलमध्ये प्रवेश हुकला.
(सलमान खानची ऑनस्क्रीन माँ रिमा लागू यांचं निधन)
मी ‘आई’ सिनेमा काढला तेव्हा माझा पहिला चॉइस रिमा होती. पण तोवर ती बिग स्टार झाली होती. तिच्याकडे वेळ नव्हता. नंतर एक नाटक करायचं ठरवलं. चंदू कुलकर्णी त्याचं दिग्दर्शन करणार होता. त्यातही रिमासाठी भूमिका असणार होती. तो विषयही बारगळला. मी ‘वास्तव’ सिनेमा करायचं ठरवलं तेव्हाही रिमाच फर्स्ट चॉइस होता. ते गणित जुळलं. मुंबईतल्या गिरणी संपानंतर कामगार कोलमडून पडला. मिल वर्कर्सची घरं त्या काळात त्या त्या घरातल्या बाईनंच चालवली. रिमानं ती भूमिका अफलातून वठवली. नंतर जिस देश में गंगा रहता है, या माझ्या सिनेमात तिनं काम केलं. ‘हत्यार’मध्येही पुन्हा आमचं समीकरण जुळलं. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’साठीही तिनं एका दिवसाचा वेळ दिला आणि सीन पूर्ण करून टाकले. ‘तुझं माझं जमेना’ या आमच्या सीरिअलचे तब्बल १२५ एपिसोड्स झाले. त्यानंतर आणखी एक नाटकही मी रीमाला घेऊन केलं.
(रिमा लागू यांच्या करियरमध्ये मैंने प्यार किया ठरला टर्निंग पॉईंट)
खरं तर रोल काय आहे, किती काम आहे, स्क्रिप्ट कसं आहे, असले प्रश्न ती मला कधी विचारायची नाही. पण नटसम्राट सिनेमा करायचं ठरवलं तेव्हा कावेरीच्या म्हणजे सरकारच्या भूमिकेसाठी तिचंच नाव माझ्या डोक्यात होतं. का कोणास ठाऊक, पण तिनं आश्चर्यकारकरीत्या तो प्रस्ताव नाकारला. तिच्या मते त्या भूमिकेत नव्यानं करण्याजोगं काही नव्हतं. प्रामाणिकपणे सांगायचं तर तिच्या अभिनयाची आणि अनुभवाची उंची मेधापेक्षा कितीतरी कसदार होती. पण रिमा नाहीच म्हणाली. तिच्या त्या नकारानं माझं नुकसान मोठं होतं. मी काहीसा दुखावलोही. पण नटसम्राटमध्ये तिच्या असण्याचा योग नव्हता. ‘आई’पासून सुरू झालेल्या हुकण्याचं एक आवर्तन जणू पूर्ण झालं. अर्थात माझ्या बाबतीतल्या अनेक पहिल्या गोष्टींचा धागा रिमाशी जोडलेला आहे. आयुष्यातली पहिली आॅफर तिनं मला दिली. ‘आई’च्या मुहूर्ताला ती होती. ‘निदान’ हा मी केलेला पहिला सिनेमा (तो प्रदर्शित नंतर झाला). त्यात तिनं अप्रतिम भूमिका साकारली होती.