"मरायचं असेल तर मरुन जाईन पण...", संजय दत्तनं उपचार घेण्यास दिलेला नकार; मग कुणाचं ऐकलं पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 02:57 PM2023-01-12T14:57:19+5:302023-01-12T15:04:04+5:30

बॉलीवूड अभिनेता संजय दत्तनं कॅन्सरला मात दिली. २०२० मध्ये संजयला स्टेज-४ चा फुफ्फुसाचा कॅन्सर झाला होता. ज्यावेळी संजयला कॅन्सरचं निदान झालं होतं तेव्हा कुटुंबीयांना मोठा धक्का बसला होता. पण अशा कठीण काळात संजय दत्त मोठ्या हिमतीनं सामोरा गेला.

स्वत: मजबुतीनं उभा राहिलाच पण कुटुंबीयांचीही भावनिक पातळीवर कोसळू दिलं नाही. पण सुरुवातीला संजय दत्त कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी अजिबात तयार नव्हता.

संजय दत्त बुधवारी बहिण प्रियासोबत एका रुग्णालयाच्या इव्हेंटसाठी उपस्थित होता. त्यावेळी संजयनं त्याच्या कठिण काळातली गोष्ट सर्वांना सांगितली. संजय दत्तवर उपचार केलेले डॉक्टरही यावेळी उपस्थित होते. कॅन्सरचं निदान झाल्याचं कळताच पहिली प्रतिक्रिया काय होती असं संजयला विचारलं.

"मला त्यावेळी कंबरेचं दुखणं होतं. हॉट वॉटर बॉटलनं शेक देऊन घरीच उपचार घेत होतो. पेन किलर्स घेऊन दिवस ढकलत होतो. पण एक दिवस मला श्वासच घेता येईना. मला रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण कॅन्सर झाल्याची माहिती मला दिली गेली नाही. रुग्णलयात मी पूर्णपणे एकटाच होतो", असं संजयनं सांगितलं.

"माझी पत्नी, कुटुंब, बहिण कुणीच माझ्याजवळ त्यावेळी नव्हतं. मी एकटा होतो आणि अचानक एक व्यक्ती आला आणि त्यानं मला कॅन्सर झाल्याचं सांगितलं. माझी पत्नी दुबईला होती. त्यामुळे प्रिया माझ्याजवळ आली. माझ्या कुटुंबातच कॅन्सरचा इतिहास राहिला आहे.

माझ्या आईलाही कॅन्सर होता. पत्नी रिचा शर्माचा मृत्यू ब्रेन कॅन्सरनं झाला. त्यामुळे मला कॅन्सर झाल्याचं कळलं तेव्हा पहिलं मी केमोथेरपी घेणार नाही असं सांगितलं होतं. मला मरायचं असेल तर मी मरुन जाईन पण कोणतीही ट्रीटमेंट घेणार नाही असं म्हटलं होतं", असं संजयनं सांगितलं.

बॉलीवूड दिग्दर्शक राकेश रोशन यांनी कॅन्सरवरील उपचारासाठी डॉक्टर सुचवल्याचं संजयनं सांगितलं. त्याकाळात आपल्याला खूप हिमतीनं सामोरं जावं लागलं होतं. केवळ आणि केवळ आपल्या कुटुंबाखातरच आपण उपचार घेण्यासाठी तयार झालो, असंही संजयनं सांगितलं.

"मी माझ्या कुटुंबाला कोसळलेलं पाहिलं आहे आणि एका रात्री मी निर्णय घेतला की जर मी आजारी राहिलो तर कुटुंबही कोसळेल. त्यामुळे कुटुंबासाठी मी लढा देण्याचं ठरवलं", असं संजयनं सांगितलं.

संजय दत्तनं सांगितलं की आपल्या आजाराबाबत त्यानं जगासमोर काहीच लपवलं नाही. कॅन्सरबाबत मी कधीच काही खोटं बोललो नाही. लोक ही गोष्ट जाहीर करू इच्छित नाहीत. पण मी करिअरची वगैरे पर्वा न करता बिनधास्तपणे सर्वांना सांगितलं आणि सामोरा गेलो. याबाबत बोलणंही मी योग्य समजतो कारण यातून भविष्यात एखाद्या गरजूला मदत होऊ शकते, असंही संजय म्हणाला.

संजय दत्तच्या सध्याच्या प्रोजेक्टबाबत बोलायचं झालं तर तो नुकताच 'शमशेरा'मध्ये पाहायला मिळाला होता. बॉक्स ऑफीसवर हा सिनेमा काही खास करू शकला नाही. पण येत्या काळात संजयचे अनेक सिनेमे रिलीज होणार आहेत. संजय दत्त सध्या हिंदी सोबतच दाक्षिणात्य सिनेमातही काम करत आहे. करिअरच्या या टप्प्यावरही संजय प्रयोगशील भूमिका करण्यापासून मागे हटताना दिसत नाही. संजय दत्तला विविध भूमिकांमध्ये पाहूनही चाहते खूप खूश होतात.