Join us

“इर्शाळवाडीत मी जेवले होते”, जुई गडकरीने सांगितल्या आठवणी, म्हणाली, “गडावर एक आजोबा...”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 6:07 PM

1 / 9
रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडाजवळील इर्शाळवाडीवर २० जुलैला दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. जवळपास ४८ घरं ढिगाऱ्याखाली सापडल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अजुनही इर्शाळगडावर बचावकार्य सुरू असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
2 / 9
या दुर्घटनेनंतर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अभिनेत्री जुई गडकरीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलं होतं. आता जुईने ‘बीबीसी मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत इर्शाळगड आणि तेथील लोकांच्या आठवणी सांगितल्या आहेत.
3 / 9
जुई म्हणाली, “माझा इर्शाळवाडी आणि इर्शाळगडाशी खूप जवळचा संबंध आहे. मी गेल्याच वर्षी तिथे ट्रेक करायला गेले होते. कर्जतच्या आसपास जेवढे गड, डोंगर आहेत...मी जवळपास ते सगळे ट्रेक केलेले आहेत. इर्शाळवाडीत मी जेवले होते. तिथल्या ठाकरवाडीत आम्ही थांबलो होतो. त्यामुळे मला जास्त वाईट वाटतंय.”
4 / 9
“त्यांची घरं साधी मातीची होती. त्यांची परिस्थितीही हलाखीची होती. रानमेवा, जांभळं, जंगलातील फळं विकून तिथली माणसं उदरनिर्वाह करतात. पण, त्यांच्या चेहऱ्यावर कधीच त्रासलेले भाव दिसले नाहीत. ते कधीच नाखुश असल्याचं दाखवत नाहीत. छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्यांना दोन तासाचा पायी प्रवास करुन खाली उतरावं लागतं. पण, तरीही तिथली माणसं नेहमी सुखात असतात.”
5 / 9
“आम्ही त्यांच्या घरात आराम करण्यासाठी थांबलो होतो. पण, आमच्या घरात का थांबलात, असे हावभाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हते. ठाकरवाडीवरील सगळ्याच माणसांचा आम्हाला नेहमी छानच अनुभव आला आहे. त्यांच्या घरात ते आम्हाला आराम करण्यासाठी चटई टाकून द्यायचे.”
6 / 9
“इर्शाळगडाची बातमी बघितल्यानंतर या सगळ्या आठवणी माझ्या डोळ्यासमोर यायला लागल्या. ही बातमी समजल्यानंतर माझ्या काही मैत्रिणी तिथे मदतीसाठी गेल्या होत्या. दीड दोन तास चढल्यानंतर आधी ठाकरवाडी लागते. त्यानंतरही पुढे चढण आहे.”
7 / 9
“इर्शाळगडावरील नेढ्यावर जायला गडाच्या मागच्या बाजूने रस्ता आहे. तिथे संपूर्ण खडक आहे. गडाच्या मागच्या बाजूला एक शिडी लावलेली असते आणि तिथे एक आजोबा नेहमी उभे असतात. येणाऱ्या प्रत्येकाला त्या शिडीवरुन पुढे जाण्यासाठी ते मदत करतात. आम्हालाही त्याच आजोबांनी मदत केली होती. ही बातमी ऐकल्यानंतर त्या सगळ्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या,” असंही जुईने सांगितलं.
8 / 9
पुढे जुई भावुक होत म्हणाली, “भविष्यात त्यांच्यापर्यंत काही गोष्टी, वैद्यकीय सुविधा पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. ज्यामुळे त्यांना मदत करणं शक्य होईल. कारण, तुमचं गाव सोडून शहरात राहायला या, असं आपण त्यांना सांगू शकत नाही. त्यांचं जीवनच ते आहे. आणि एवढा सुंदर निसर्ग सोडून कोण कसं येईल?”
9 / 9
“काहीतरी चमत्कार व्हावा आणि जास्तीत जास्त लोक वाचू दे, एवढीच देवाकडे प्रार्थना करतेय. असं कोणाबरोबरही घडू नये. या प्रसंगातून सावरण्यासाठी देव त्यांना बळ देवो. कुठल्याच ठाकरवाडीवर ही परिस्थिती येऊ नये, एवढीच इच्छा मी व्यक्त करते.”
टॅग्स :रायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरणजुई गडकरीमराठी अभिनेता