Year Ender 2021: बॉलिवूडच्या या 8 वादांनी गाजलं मावळतं वर्ष By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 08:00 AM 2021-12-20T08:00:00+5:30 2021-12-20T09:43:10+5:30
Year Ender 2021: हे मावळतं वर्ष बॉलिवूडच्या वादांनी गाजलं. एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून लोक सावरण्याचा प्रयत्न करत होते तर अनेक बॉलिवूड स्टार्स या ना त्या निमित्ताने वादात अडकले होते... हे मावळतं वर्ष बॉलिवूडच्या वादांनी गाजलं. होय, या वादांनी बॉलिवूड ढवळून निघालं. एकीकडे कोरोनाच्या दुसºया लाटेतून लोक सावरण्याचा प्रयत्न करत होते तर अनेक बॉलिवूड स्टार्स या ना त्या निमित्ताने वादात अडकले होते. आर्यन खानपासून तर सैफ अली खान, तापसी पन्नू, जॅकलिन फर्नांडिस शिवाय कंगना राणौत अशा अनेकांनी मावळत्या वर्षात वाद ओढवून घेतले.
2021 ची सुरूवात झाली ती ‘तांडव’ या वेबसीरिजच्या वादाने. होय, 2021 च्या सुरुवातीला ही सीरिज रिलीज झाली होती. यातील सैफ अली खानच्या दृश्यांमुळे वाद उफाहून आला. संतप्त लोकांनी मेकर्सच्या विरोधात तक्रारही केली. हा वाद इतका वाढला होता की, अखेर मेकर्सला यातील काही सीन्स डिलीट करावे लागले होते.
इंडियन आयडल या शोने या वर्षात वाद ओढवून घेतला. शोच्या 12 व्या सीझनच्या ‘किशोर कुमार स्पेशल’ एपिसोडमध्ये स्पेशल गेस्ट बनून आलेले किशोर कुमार यांचे चिरंजीव अमित कुमार यांनी धक्कादायक खुलासा केला होता. स्पर्धकांचे खोटं कौतुक करायला सांगण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या धक्कादायक खुलाशानंतर इंडस्ट्रीत जणू खळबळ माजली होती. इंडियन आयडलवर प्रचंड टीका झाली होती.
मनोज वाजपेयीची सर्वाधिक गाजलेली वेबसीरिज ‘फॅमिली’चा पहिला सीझन लोकांना प्रचंड आवडला होता. दुसरा सीझन पाहण्यासाठी लोक उत्सुक झाले होते. पण दुसरा सीझन आला आणि सीरिज कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये आली. सीरिजमध्ये श्रीलंकेत आपल्या हिताची लढाई लढणा-या तामिळ बंडखोरांचा संबंध ‘आयएसआयएस’ या अतिरेकी संघटनेशी जोडला गेल्याचा दावा अनेक लोकांनी केला होता. ‘द फॅमिली मॅन 2’ तामिळविरोधी आहे, तामळींना अतिरेक्यांसारखे दाखवण्यात आले आहे, असा लोकांचा आरोप होता. या पार्श्वभूमीवर अनेकांनी साऊथची सुपरस्टार सामंथा अक्कीनेनीला तामिळ फिल्म इंडस्ट्रीतून हद्दपार करण्याचा इशाराही दिला होता.
पोर्नोग्राफी प्रकरणात शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक झाली होती. यामुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ माजली होती. राजमुळे शिल्पाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल व्हावं लागलं होतं.
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील बबीताजी अर्थात मूनमून दात्तसाठी हे वर्ष प्रचंड मन:स्ताप देणारं ठरलं असं म्हणायला हरकत नाही. होय, मुनमुन दत्ताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात जातीवाचक शब्दांचा वापर केल्याचा आरोप करत, लोकांनी मुनमुनला प्रचंड ट्रोल केलं होतं. शिवाय तिच्या अटकेचीही मागणी झाली होती. यानंतर तारक मेहता का उल्टा चष्मा टप्पू अर्थात राज अनातकत याच्यासोबत तिच्या अफेअरच्या अफवा उडाल्या होत्या.
2021 हे वर्ष सर्वाधिक गाजलं ते शाहरूख खानचा लेक आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणामुळे. होय, ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला एनसीबीने अटक केली होती. 26 दिवस आर्यनला जेलमध्ये राहावं लागलं. यादरम्यान अनेकांनी आर्यनला ट्रोल केलं होतं. याऊलट बॉलिवूडचे सेलिब्रिटी आर्यनच्या बाजूने मैदानात उतरले होते. विशेष म्हणजे, या प्रकरणामुळे राजकारणही तापलं होतं.
कंगना राणौत तशीही वाद ओढवून घेते. पण या वर्षात तिची एक टीप्पणी सर्वाधिक वादग्रस्त ठरली. 1947 साली मिळालेलं स्वातंत्र्य भीकेत मिळालं होतं. खरं स्वातंत्र्य 2014 साली मिळालं, असं वक्तव्य कंगनाने केलं होतं. यावरून तिच्यावर प्रचंड टीका झाली होती.
जॅकलिन फर्नांडिस या वर्षात वादात अकडली. 200कोटी रूपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर यांच्यासोबतच्या संबंधामुळे जॅकलिनला ईडीच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. सुकेशसोबतचे तिचे काही प्रायव्हेट फोटोही व्हायरल झालेत. अलीकडे एका शोसाठी विदेशात जात असताना ईडीने तिला ताब्यात घेतलं होतं आणि चौकशीनंतर सोडलं होतं.