Join us  

राष्ट्रपती भवनात ‘पिकू’चे खास स्क्रिनिंग

By admin | Published: June 08, 2015 10:32 PM

राष्ट्रपती भवनात रविवारी ‘पिकू’ या मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाचा खास शो दाखविण्यात आला. स्वत: अमिताभ यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी हा चित्रपट बघून त्याला दाद दिली.

नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनात रविवारी ‘पिकू’ या मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाचा खास शो दाखविण्यात आला. स्वत: अमिताभ यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी हा चित्रपट बघून त्याला दाद दिली.बंगाली कुटुंबावर आधारलेला हा चित्रपट बघून राष्ट्रपतींनी पसंतीची पावती दिल्याची प्रतिक्रिया अमिताभ यांनी दिली आहे. ७२ वर्षीय अमिताभ यांच्यासोबत या चित्रपटाचे दिग्दर्शक सूजित सरकार, पुत्र अभिषेक बच्चन उपस्थित होते. अभिनेत्री दीपिका आणि इरफान खान विदेशात असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत.राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पिकू बघितला असून ते या चित्रपटाच्या प्रेमात पडले, असे मी विनम्रपणे सांगू इच्छितो. त्यांनी बेंगाली- हिंदी उच्चारांचा सुंदर मिलाफ असलेल्या या चित्रपटाचा आनंद घेतला. या चित्रपटात दोष काढायला कोणताही वाव नसल्याचे त्यांना वाटले, असे अमिताभ यांनी रविवारी रात्री आपल्या ब्लॉगवर म्हटले. राष्ट्रपतींनी व्यासपीठावर आमचे स्वागत करीत मानचिन्ह भेट दिले. त्यांनी भोजनाचे निमंत्रणही दिले. भोजनाच्यावेळीही आम्ही या चित्रपटाच्या गुणवत्तेवर चर्चा केली, असेही त्यांनी ब्लॉगवर म्हटले.अमिताभ यांच्या ‘भूतनाथ रिटर्न्स’ या चित्रटात मतदानाचे महत्त्व विशद केले असून गेल्यावर्षी या चित्रपटाचेही राष्ट्रपतींसाठी खास स्क्रिनिंग आयोजित केले होते. राष्ट्रपतींनी पुन्हा हा सन्मान मिळवून दिल्याबद्दल अमिताभ यांनी त्यांचे आभार मानले. अशा सन्मानाची तुलना होऊच शकत नाही. राष्ट्रपतींनी अमूल्य वेळ आणि सन्मान मिळवून दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असेही अमिताभ यांनी म्हटले.