पिंक या चित्रपटाचे सगळेच कौतुक करत आहेत. त्यामुळे संथ सुरुवातीनंतर पिंकच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे तर ‘राज-रिबोट’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर साधारण व्यवसाय केला आहे. ‘बार बार देखो’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर कमाल करेल असे सगळ्यांना वाटत असताना या चित्रपटाने पूर्णच अपेक्षाभंग केला. अनिरुद्ध रॉय चौधरी दिग्दर्शित ‘पिंक’ चित्रपटाला समीक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे सादरीकरण, कलावंतांचा जबरदस्त अभिनय, एकूणच चित्रपटाची भट्टी चांगली जमली होती. पण पहिल्या दिवशी चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. परंतु दुसऱ्या दिवसापासून चित्रपटाच्या व्यवसायात चांगलीच वाढ झाली. शुक्रवारी चित्रपटाने 4.30 कोटींचा व्यवसाय केला तर रविवारी चित्रपटाने 9 कोटींचा टप्पा ओलांडला. पहिल्या तीन दिवसांत चित्रपटाने २१ कोटी कमावले आहेत.या उलट इम्रान हश्मीच्या ‘राज-रिबोट’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी 6 कोटींच्या वर गल्ला जमवला. परंतु दुसऱ्या दिवशी चित्रपटाचा व्यवसाय 5.30 कोटींवर आला. पहिल्या तीन दिवसाअखेर चित्रपटाने 18 कोटींचा आकडा ओलांडला होता. हिट या सदरात मोडण्यासाठी दोन्ही चित्रपटांना येणाऱ्या दिवसांत चांगला धंदा करावा लागणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफ यांच्या ‘बार बार देखो’ची प्रदर्शित होण्याअगोदर चांगली हवा होती. परंतु बॉक्स आॅफिसवर या चित्रपटाने खूपच कमी व्यवसाय केला. -एन. पी. यादव, ट्रेड अॅनालिस्ट
पिंकला मिळतोय चांगला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2016 3:01 AM